|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाविजेत्या माळी गल्लीसह सर्वच मंडळांचा जल्लोष

महाविजेत्या माळी गल्लीसह सर्वच मंडळांचा जल्लोष 

प्रतिनिधी /बेळगाव

लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित विधायक गणेशोत्सव स्पर्धा-2017 चा बक्षीस वितरण समारंभ रविवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे थाटात पार पडला. या स्पर्धेतील महाविजेता ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माळी गल्लीसह सर्वच विभागीय विजेत्या मंडळांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हा सोहळा रंगला होता.

 तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकमान्यचे संचालक व मनपाचे माजी गटनेते पंढरी परब, सुबोध गावडे, गजाननराव धामणेकर, अजित गरगट्टी, परीक्षक नितीन कपिलेश्वरकर, परशराम माळी, लोकमान्य मिलिटरी ट्रेनिंग अकादमीचे प्रमुख कर्नल दीपक गुरुंग, शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संचालक पंढरी परब यांनी प्रास्ताविक करताना बेळगावच्या गणेशोत्सवाची माहिती जगभर पसरली आहे. लोकमान्यचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून ही भव्य स्पर्धा भरविली जाते. यामुळे या उत्सवाचा पारंपरिकपणा पुन्हा समोर येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. केवळ गणेशोत्सवापूरते विधायक काम करण्यापेक्षा सतत विधायकपद्धतीने वागण्याची गरज त्यांनी यावेळी मांडली. जागरुकता आणि चळवळ उभी करण्याचे काम होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आज शाळकरी व महाविद्यालयीन मुले आपले वाढदिवस शाळांच्या आवारात चुकीच्या पद्धतीने साजरे करत आहेत. सहलीच्या निमित्ताने मद्यधुंद अवस्थेत भरकटत जाणारी पिढी त्यांच्या पालकांचेच नुकसान करत आहे. अनेक तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू लागले आहेत. अशावेळी मंडळांनी साऱया विकृतींचा बिमोड करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलेल्या तुरमुरीच्या मलप्रभा जाधवचे अभिनंदन करण्यात आले. तसेच रुक्मिणीनगर येथे दिवंगत झालेल्या मोहन भडगावी या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला गणेशोत्सव मंडळांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. पारितोषिक मिळाले व त्यातून आर्थिक मदत झाली तर त्या मदतीचा विधायक कार्य करण्यासाठी उपयोग करा. समाजाला मदत होऊ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नेताजी जाधव यांनी लोकमान्यच्या माध्यमातून विधायक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी होण्यासाठी किरण ठाकुर यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे. बरीचशी मंडळे चांगली कामे करू लागली आहेत. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत नाचणे थांबले आहे. किरण ठाकुर यांनी या माध्यमातून मोठा बदल घडवून आणला आहे, असे सांगितले.

प्रत्येक भागासाठी वेगवेगळी बक्षिसे देण्याच्या प्रयत्नांमुळे सर्व मंडळांना प्रोत्साहन मिळू शकत आहे. लोकमान्यच्या या वेगवेगळय़ा सुविधांचा लाभ तरुणांनी घ्यावा, तसेच विधायकतेची परंपरा चालू ठेवावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

मुख्य परीक्षक नितीन कपिलेश्वरकर यांनी विधायक गणेशोत्सव स्पर्धेत कशाप्रकारे गुण दिले जातात व मंडळांनी कशा प्रकारे कार्य केले पाहिजे, याची माहिती दिली. बरीचशी मंडळे स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मात्र आपण केलेल्या कामाची सूची आणून देत नाहीत. बऱयाचदा दिलेल्या सूचीमध्ये योग्य माहिती दिली जात नाही. या उणिवा सांगितल्या. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळापेक्षा आता मंडळांच्या कार्यपद्धतीत चांगले बदल जाणवतात. प्रगतीही चांगली आहे, याचीही नोंद केली.

 

यावषी महाविजेता होण्याचा मान माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाला. 1 लाख रुपये व स्मृतिचिन्ह तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री तसेच लोकमान्यच्या सर्व संचालक मंडळाच्यावतीने देण्यात आले. विभागीय प्रथम आलेल्या मंडळांमधून ग्रामीण विभागात तानाजी-मारुती गल्ली, येळ्ळूर, शहापूर विभागात धर्मवीर संभाजीनगर वडगाव आणि बेळगाव विभागातून एकनि÷ युवक मंडळ मराठा गल्ली, महाद्वार रोड यांचा समावेश होता. त्यांनाही रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले.

  गणेशोत्सव स्पर्धा-2018 च्या प्रवेशिकांचे वितरण सुरू

लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित लोकमान्य विधायक गणेशोत्सव स्पर्धा-2018 सालाकरिता प्रवेशिकांचे वितरण सुरू झाले आहे. मंडळांच्या कार्यंकर्त्यांनी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथून अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुउपस्थित मंडळांनी कार्यालयातून बक्षिसे नेण्याचे आवाहन

बक्षीस वितरण समारंभात बक्षीस घेण्यास उपस्थित राहू न शकलेल्या मंडळांनी लोकमान्य सोसायटीच्या खानापूर रोड येथील मुख्य कार्यालयात उपस्थित राहून आपली बक्षिसे घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.