|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशमूर्तींवर फिरतोय शेवटचा हात…!

गणेशमूर्तींवर फिरतोय शेवटचा हात…! 

मूर्तिकारांची दिवस-रात्र मेहनत सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात शहरवासियांना वेध लागले ते गणपती बाप्पांच्या आगमनाचे…! अवघ्या 3 दिवसांवर गणेशचतुर्थी येऊन ठेपली आहे. यामुळे सारेच मूर्तिकार गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. गणेशमूर्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या लगबग सुरू आहे. रात्रीचा दिवस करत हे मूर्तिकार गणेशमूर्ती पूर्ण करण्याकडे भर देत आहेत. शेवटच्या टप्प्यात गणरायांच्या मूर्तींत जीव भरण्याचे काम सुरू आहे.

शहर तसेच परिसरात मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यामुळे सारेच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्यासाठी घाईगडबडीत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात पाहावयास मिळत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मूर्तिकार विविध स्वरुपातील मूर्ती साकारण्यात गुंतले असून सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती रंगविण्याकडे अधिक भर देण्यात आला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही गणरायांच्या आगमनाची चाहुल सर्वांनाच लागून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

बेळगावात गणेशचतुर्थी ही पुणे आणि मुंबईनंतर मोठय़ा आनंदाने उत्साहाने  साजरी केली जाते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी काही प्रमाणात मूर्तींची मागणी वाढल्याचे मूर्तिकारांतून सांगण्यात आले. या बरोबरच मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱया साहित्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक मूर्तिकारांनी घरगुती मूर्ती बनविण्याचे काम संपविले असून आता सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील दोन महिन्यांपासूनच या कामाला सुरुवात झाली असली तरी शेवटचे दिवस महत्त्वाचे आहेत. मूर्ती सजविणे या प्रकारातील  सर्व प्रकारची कामे सुरू झाली आहेत. 

नार्वेकर गल्ली येथील विशाल गोदे, अनगोळ येथील जे. जे. पाटील यांचे कुटुंबीय, मुतगा येथील मनोहर पाटील, भांदूर गल्ली येथील मनोहर पाटील, कपिलेश्वर रोड येथील जोतिबा कुंभार व संदीप कुंभार, रामदेव गल्ली येथील संजय किल्लेकर, अनगोळ येथील संजय मस्ते, मंडोळी येथील विद्याधर लोहार, केदनूर येथील सिद्राय लोहार व इतर मूर्तिकार सध्या मूर्ती साकारण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे. हुबळी, धारवाड, विजापूर, गोवा आदी ठिकाणी बाहेर पाठविण्यात येणाऱया मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. सोमवार, मंगळवार व बुधवारपर्यंत ही कामे चालणार आहेत.

बेळगावातील गणेशोत्सव हा अनेकांना भुरळ पाडतो. गोवा, महाराष्ट्रातील लोक गणेशमूर्ती पाहण्यासाठी बेळगावात येत असतात. सध्या सर्वच मूर्तिकार सुबक आणि आकर्षक मूर्ती बनविण्याकडे वळले आहेत. या संदर्भात नार्वेकर गल्ली येथील मूर्तिकार विशाल गोदे यांच्याशी संवाद साधला असता आता शेवटचे तीनच दिवस उरले असून मूर्ती सजविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ज्याप्रमाणे मूर्तीचे काम पूर्ण होईल त्याप्रमाणे मंडळे आपापल्या मूर्ती घेऊन जात आहेत. यामुळे दिवस-रात्र काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. यावषी मंडळांनी विविध आकारातील आकर्षक मूर्ती आणि रंगसंगतींवर भर दिला आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यातील हे काम अतिशय काळजीपूर्वक आणि तितक्मयाच जलद गतीने करावे लागते, असे ते म्हणाले.

यावषी मूर्तीला सजविण्यासाठी गणेश मंडळांकडून तसेच घरगुती उत्सव साजरा करणाऱया भाविकांकडून कुंदनवर्कची मागणी वाढली आहे. आकर्षक आणि चमकदार साहित्याने आपल्या मूर्तीला सजवून घेण्यावर अनेकांचा भर आहे. या संदर्भात महिला मूर्तिकार सुमिता यांनी माहिती दिली. दरवषी अशी सजावट करून घेतली जाते. यंदा सगळीकडेच या कुंदनवर्कला मागणी आहे. यामुळे मूर्ती रंगवून झाल्यावर ती सजविण्यावर विशेष लक्ष द्यावे लागत आहे, असे त्या म्हणाल्या.

मूर्तिकार जितके महत्त्वाचे तितकेच त्यांना साहाय्य करणारे कारागीरही महत्त्वाचे. महेश शहापूरकर या कारागिराने शेवटच्या टप्प्यातील आपल्या कामाची माहिती दिली. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर गणेशमूर्तीचे सुळे, नेत्र, कपाळावरील तिलक आदी गोष्टींकडे विशेष भर द्यावा लागतो. ही कामे सध्या सुरू आहेत. जास्तीत जास्त काम निपटून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे त्याने सांगितले.

मागील वर्षी केलेल्या बुकिंगप्रमाणे यावर्षी सार्वजनिक मंडळांची मागणी लक्षात घेता मूर्तिकारांनी मूर्ती बनविल्या आहेत. मंडळांनीही मंडप उभारणीपासून इतर तयारी सुरू केली आहे. मूर्ती घेऊन जाण्याची लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीला मूर्ती नेताना उशीर होऊ नये म्हणून आतापासूनच मंडळे मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मूर्तीवर शेवटचा हात फिरताना आणि मूर्तीमध्ये जीव भरताना मूर्तिकार तल्लीन होऊन जातो आणि पाहणारेही हरवून जातात, असेच चित्र सध्या कार्यशाळांमध्ये दिसून येत आहे.