|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देण्यात आलेली वेतनवाढ वसूल करण्याचा सपाटा

देण्यात आलेली वेतनवाढ वसूल करण्याचा सपाटा 

बेळगाव / प्रतिनिधी

महापालिकेत एकाच पदावर कार्यरत राहणाऱया कर्मचाऱयांना वेतनवाढ देण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला होता. 2012 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. पण ही वेतनवाढ 2016 पासून लागू करण्यात यावी, अशी सूचना करून देण्यात आलेली वेतनवाढ निवृत्त कर्मचाऱयांच्या पेन्शनमधून वसूल करण्याचा सपाटा लघु बचत खात्याने चालविला आहे.

बढती आणि बदली नियमावलीची अंमलबजावणी नगरविकास खात्याने केली आहे. पण महापालिकेतील ‘चतुर्थ’ श्रेणीच्या कर्मचाऱयांची बदली केली जात नाही. तसेच त्यांना बढतीदेखील दिली जात नाही. खातेनिहाय परीक्षा दिल्यास त्यांना बढती मिळू शकते. पण स्वच्छता कर्मचारी, शिपाई, वाहन चालक अशा पदांवर काम करणाऱया कर्मचाऱयांना बढती मिळत नाही. त्यांना वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्य करावे लागते. यामुळे त्यांना वेतनवाढही मिळत नाही. अशा कर्मचाऱयांना वेतनवाढ देण्याचा आदेश नगरविकास खात्याने 2012 मध्ये दिला होता. महानगरपालिकेत एकाच पदावर 10, 15 आणि 25 वर्षे काम करणाऱया कर्मचाऱयांना ही वेतनवाढ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी महानगरपालिकेने त्याच वेळी केली होती.

पण या वेतनवाढीबाबत नव्याने वाद निर्माण झाला आहे. याची अंमलबजावणी कधीपासून करायची याबाबतचा कोणताही उल्लेख 2012 मध्ये बजावण्यात आलेल्या आदेशामध्ये नव्हता. यामुळे याची अंमलबजावणी कधीपासून करायची याची विचारणा बेळगावसह विविध महानगरपालिकांनी नगरविकास खात्याकडे केली होती. पण केवळ हुबळी-धारवाड महापालिकेलाच याबाबतचे स्पष्टीकरण 2016 मध्ये देण्यात आले होते. भविष्यात आतापासून अंमलबजावणी करावी, अशी सूचना नगरविकास खात्याने हुबळी-धारवाड नगरपालिकेला केली होती. पण बेळगाव महानगरपालिकेला अद्यापही कोणतेच उत्तर मिळाले नाही.

बेळगाव महानगरपालिकेने 2012 पासूनच 10, 15, 25 वर्षे एकाच पदावर काम करणाऱया कर्मचाऱयांची वेतनवाढ केली आहे. पण याची अडचण आता निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱयांना भेडसावत आहे. निवृत्तीवेतन मिळण्यासाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱयांच्या निवृत्ती वेतनात कपात करण्यात आली आहे. वेतनवाढीची अंमलबजावणी 2016 पासून करण्याऐवजी 2012 पासून करण्यात आली असल्याचा ठपका ठेऊन 4 वर्षांच्या वेतनवाढीची रक्कम कर्मचाऱयांकडून वसूल करण्याची सूचना लघु बचत खात्याने महानगरपालिकेला केली आहे. पण याची अंमलबजावणी महानगरपालिकेने केली नाही. यामुळे लघु बचत विभागाने कर्मचाऱयांच्या निवृत्ती वेतनामधून वेतनवाढीची रक्कम वसूल करण्याचा सपाटा चालविला आहे. 2012 ते 2016 दरम्यान देण्यात आलेली वेतनवाढीची रक्कम वसूल करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱयांच्या निवृत्ती वेतनामधून दोन ते अडीच हजार रुपये कपात करण्यात येत असल्याची तक्रार निवृत्त कर्मचारी करीत आहेत. शासनाच्या आदेशानुसारच वेतनवाढ देण्यात आलेली असताना त्यात पुन्हा कपात करण्यात येत असल्याने कर्मचारीवर्गात संतापाची लाट उसळली आहे. बचत खात्याने चालविलेला प्रकार चुकीचा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून प्रत्युत्तर आल्यानंतरच वेतनवाढीची रक्कम कपात किंवा वसूल करण्यात यावी, अशा प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करीत आहेत. निवृत्तीवेतन देण्यासच महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे. अशात आता निवृत्ती वेतनातही कपात करण्यात येत असल्याने मनपाचे निवृत्त कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत.