|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिंडलगा तलावात दोन मुलांचे मृतदेह

हिंडलगा तलावात दोन मुलांचे मृतदेह 

प्रतिनिधी / बेळगाव

हिंडलगा कल्मेश्वर मंदिरजवळील तलावात रविवारी दोन मृतदेह आढळून आले आहेत. काकती पोलिसांनी ते मृतदेह रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तलावामधून बाहेर काढून शवागृहात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले आहेत. ज्योतीनगर येथील बेपत्ता असलेल्या मुलांचे ते मृतदेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बॉक्साईट रोड जवळील कल्मेश्वर मंदिरापासून अर्धा किलोमीटर आत असलेल्या तलावामध्ये दोन मुलांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी ग्राम पंचायत सदस्य रवि कोकीतकर यांना दिली. यामुळे रवि कोकीतकर यांनी काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. ज्योतीनगर येथील दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार कॅम्प पोलीस स्थानकात देण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या पालकांना संपर्क साधून माहिती दिली. पण रात्री उशिरापर्यंत पालक घटनास्थळी दाखल झाले नाही. पोलीस अधिकाऱयांनी सदर मृतदेह तलावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. पण अंधार असल्याने दिव्याची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली. यामुळे रवि कोकीतकर यांनी ग्राम पंचायतच्या कर्मचाऱयांना बोलावून दोन ठिकाणी दिव्यांची व्यवस्था केली. यामुळे मृतदेह काढण्यास रात्री उशिर झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सदर मृतदेह पोलीस अधिकाऱयांनी सरकारी रूग्णालयाच्या शवागृहात पाठविले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांच्यासह साहाय्यक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

युवकांचे सहकार्य

मृतदेह तलावाबाहेर काढण्यासाठी पथदीप लावण्यासह मृतदेह वाहनामध्ये ठेवण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य रवि कोकीतकर, शुभम चव्हाण, मनोज हित्तलमनी, आदर्श निडसोसी, देवाप्पा जगताप, संभाजी चौगुले व इतर युवकांनी  सहकार्य केले.     

 बेपत्ता मुले तलावात बुडाल्याचा संशय

ज्योतीनगर, गणेशपूर येथील दोन शाळकरी मुले शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. कुटुंबिय त्यांचा शोध घेत आहेत. या मुलांचे कपडे बॉक्साईट रोडवरील एका तलावाच्या काठावर आढळून आल्याने ते तलावात बुडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रोहन कोऱहागडे (वय 15), अंश शिंदे (वय 14) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर हे दोघे जेवण करुन सायकलवरुन बाहेर पडले होते. रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांना चिंता लागून राहिली होती.

या दोन्ही मुलांच्या कुटुंबियांनी रविवारी दुपारी फिर्याद दाखल करण्यासाठी कॅम्प पोलीस स्थानक गाठले. फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच हे दोघे मध्यवर्ती बस स्थानकावर आहेत, अशी माहिती कोणी तरी फोनवरुन त्यांना दिली. त्यानंतर त्या मुलांना शोधण्यासाठी कुटुंबिय व नातेवाईक बसस्थानकाकडे गेले होते.

रात्री बॉक्साईट रोडवरील कलमेश्वर मंदिरापासून सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या एका तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळून आल्यामुळे रात्री उशीरा तलावामधून बाहेर काढण्यात आलेले मृतदेह त्यांचेच असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

Related posts: