|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » सप्टेंबरमध्ये 56 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक

सप्टेंबरमध्ये 56 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक 

कमजोर रुपया, तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपया कमजोर होत असल्याने भांडवली बाजारात होणाऱया गुंतवणुकीवर परिणाम दिसून येत आहे. चालू महिन्यातील पहिल्या पाच सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी 56 अब्ज रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले आहे. गेल्या दोन महिन्यात बाजारात करण्यात आलेली गुंतवणूक काढण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला.

इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही प्रकारात 52 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात हा आकडा 23 अब्ज रुपयांचा होता. विदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून कालावधीदरम्यान 610 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार 3 ते 7 सप्टेंबरदरम्यान इक्विटी प्रकारातून 10.21 अब्ज आणि डेब्ट बाजारातून 46.28 अब्ज रुपयांची निर्गुंतणूक केली. यामुळे पाच सत्रात एकूण 56.49 अब्ज रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कमजोर बाजारपेठ, सेबीकडून वितरित करण्यात आलेले विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीसंदर्भातील पत्रक, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपया कमजोर होण्याचे प्रमुख कारणे असल्याचे बाजार तज्ञांचे म्हणणे आहे. ऍम्री या विदेशी गुंतवणूकदारांच्या लॉबी गुपच्या मते, केवायसीसंदर्भातील प्रस्तावित नियम सेबीकडून लागू करण्यात आल्यास 75 अब्ज डॉलर्सची निर्गुंतवणूक करण्यात येईल. मात्र सेबीने ही शक्यता फेटाळून लावली आहे. चालू वर्षात इक्विटीमधून 35 अब्ज आणि डेब्ट प्रकारातून 426 अब्ज रुपयांची निर्गुंतवणूक करण्यात आली आहे.