|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » 16 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण

16 मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण 

सेन्सेक्स 467, निफ्टी 151 अंकाने कमजोर

वृत्तसंस्था/ मुंबई

रुपयाने ऐतिहासिक निचांकी पातळी गाठल्याने, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार संकट विस्तारण्याची शक्यता असल्याने बाजारात एक टक्क्यापर्यंत म्हणजेच 467 अंकाने घसरण झाली. बीएसईचा सेन्सेक्स तीन आठवडय़ांच्या तळाला पोहोचला आहे. 16 मार्च रोजी झालेल्या 509 अंकाच्या कमजोरीनंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली. सेन्सेक्स 38 हजार आणि निफ्टी 11,500 च्या खाली बंद झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 467 अंकाने कोसळत 37,922 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 151 अंकाने घसरत 11,438 वर स्थिरावला. 6 फेब्रुवारीनंतर   निफ्टीमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली.

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या सुरू असणारे व्यापार युद्ध अधिकच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनमधून आयात होणाऱया वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची धमकी दिली. या प्रत्युत्तर देताना चीननेही सारखीच कारवाईचा इशारा दिला. याचा परिणाम भारतासारख्या उभरत्या बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे.

अमेरिका-चीन व्यापार युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, वाढती चालू खाते तूट, अमेरिकेतील रोजगार आकडेवारी मजबूत होत असल्याने डॉलरचे मजबूत, रुपयातील घसरण आणि 10 वर्षांच्या यिल्डमध्ये वाढ दिसून आल्याने बाजार कोसळण्यास मदत झाली.

याव्यतिरिक्त मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने रुपया कमजोर होत असल्याने भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्याने नकारात्मक संकेत दिल्याचे पडसाद दिसून आला. 2018 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 13 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मात्र सोमवारी आरबीआयने हस्तक्षेप केल्याने काही प्रमाणात तेजी आली. आरबीआयच्या आकडेवारीनुसार एप्रिल-जून तिमाहीदम्यान चालू खाते तूट वाढत 15.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. व्यापारी तूट वाढत असल्याने ती 2017-18 च्या समान कालावधीच्या 15 अब्ज डॉलर्स नजीक पोहोचली आहे.

बीएसईचा वाहन निर्देशांक 1.75 टक्के, धातू 1.74 टक्के, एनर्जी 1.67 टक्के, एफएमसीजी 1.65 टक्के, तेल आणि वायू 1.59 टक्के, रिअल्टी 1.51 टक्के, आरोग्यसेवा आणि वित्त निर्देशांक प्रत्येकी 1.50 टक्क्यांनी घसरला.

केवळ आयटी निर्देशांक 0.02 टक्क्यांनी वधारला.