|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानने जाणला ‘चीनचा डाव’

पाकिस्तानने जाणला ‘चीनचा डाव’ 

सीपीईसी करार पाकसाठी अयोग्य  इम्रान खान यांचे सरकार करणार समीक्षा

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱया चीन-पाक आर्थिक पट्टय़ाबद्दल चीनचा स्वार्थी डाव पाकिस्तानला समजू लागल्याचे म्हणणे योग्य ठरेल. पाकिस्तानातील नव्या इम्रान खान सरकारने चीनसोबतचा सीपीईसी करार अयोग्य ठरविला आहे. ब्रिटनचे मुख्य वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सने (एफटी) याबद्दलचे वृत्त प्रकाशित केले आहे.

पाकिस्तानने सीपीईसीचा करार ‘अयोग्य’ असल्याचे म्हटले आहे. चीन-पाक आर्थिक पट्टय़ाबद्दल करण्यात आलेल्या एकतर्फी करारांमुळे चिनी कंपन्यांना मोठा लाभ होतोय. परंतु पाकिस्तानी कंपन्यांना यातून कोणतेच उत्पन्न मिळत नसल्याची धारणा इम्रान खान सरकारची झाली आहे.

करारात अनेक त्रुटी

इम्रान खान यांचे सरकार चीनच्या ओबोर प्रकल्पातील स्वतःच्या भूमिकेची समीक्षा करणार आहे. दशकापूर्वी झालेला व्यापार करार देखील नव्याने निश्चित केला जाणार आहे. सीपीईसीवर चीनसोबत करार करताना मागील सरकारने अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी प्रकल्पाबद्दलचा गृहपाठ योग्य पद्धतीने केला नाही. तसेच प्रकल्पामुळे अधिकाधिक लाभ होईल हे पाहिले गेले नसल्याचे इम्रान यांचे उद्योगविषयक सल्लागार अब्दुल रज्जाक दाऊद यांनी म्हटले.

मतभेदांची ठिगणी

चीनसोबत सर्वकालीन मैत्री पाकिस्तानच्या विदेश धोरणाचा पाया असल्याचे इम्रान यांनी चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्या दौऱयावेळी म्हटले आहे. परंतु सीपीईसीवरून दोन्ही देशांमध्ये मतभेदांची ठिगणी पेटली आहे हे मात्र निश्चित. चीनचे विदेश मंत्री वांग यांनी नव्या सरकारसोबत संबंध दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इम्रान यांच्या सरकारसमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा असताना सीपीईसीतून होणारे नुकसान निश्चितच सलणारे आहे.

प्रकल्प थांबवूया

पाकिस्तानचे नवे सरकार सीपीईसीबद्दल गांभीर्याने चर्चा करत असल्याचे सल्लागारांच्या विधानातून जाणवते. चिनी कंपन्यांना करात सूट देण्यासोबतच पाकिस्तानकडून अनेक लाभ प्राप्त झाले. पाकिस्तानच्या कंपन्यांना तोटा होत असल्याने या कराराची आम्ही समीक्षा करणार आहोत. सीपीईसी एक वर्षासाठी थांबवून पुढील चर्चा केली जावी, असे आपले मानणे असल्याचे दाऊद म्हणाले.

दिवाळखोर पाकिस्तान

सल्लागारांनी प्रकल्पाची पारदर्शकता आणि प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परंतु पंतप्रधान झाल्यावर इम्रान खान यांची सीपीईसीबद्दलची भूमिका मवाळ झाल्याचे मानले जाते. कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानात सीपीईसी प्रकल्पाबद्दल चर्चा रंगली आहे. चीनच्या कर्जाने पाकिस्तानला दिवाळखोर केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. प्रकल्पामुळे पाकिस्तानावर कर्ज लादले नसल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ चीनच्या विदेश मंत्र्यांवर आली आहे.

Related posts: