|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनपीए संपुआ सरकारचेच पाप!

एनपीए संपुआ सरकारचेच पाप! 

रघुराम राजनांनी मांडली भूमिका : संपुआची निर्णयक्षमता होती मंदावलेली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वाढत्या एनपीएबद्दल संसदेच्या समितीला पाठविलेल्या स्वतःच्या उत्तराद्वारे मागील संपुआ सरकारलाच (मनमोहन सिंग यांचे सरकार) आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. घोटाळे आणि त्यांच्या चौकशीमुळे संपुआ सरकारची निर्णयक्षमता मंदावत गेल्याने एनपीएचे संकट वाढत गेल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.

भाजप खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या समितीने राजन यांना पत्र लिहून एनपीएच्या मुद्यावर भूमिका मांडण्यास सांगितले होते. बँकांकडून मोठय़ा कर्जांवर योग्य कारवाई करण्यात आली नाही. 2006 नंतर विकासाचा वेग मंदावल्याने बँकांच्या व्यवसायवृद्धीचे अनुमान चुकीचे ठरल्याचे राजन यांनी स्वतःच्या उत्तरात नमूद केले आहे. संपुआ सरकारच्या काळात कर्जांच्या वाटपात झालेल्या अनियमिततेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका अडचणीत आल्या आहेत.

एनपीए संकट ओळखणे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याने राजन यांची माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी समितीसमोर प्रशंसा केली होती. एनपीए समस्या योग्यप्रकारे ओळखण्याचे शेय माजी गव्हर्नर रघुराम राजना यांनाच जाते. देशात एनपीएची समस्या अत्यंत गंभीर कशी झाली हे त्यांच्यावाचून दुसरा कोणीच चांगल्याप्रकारे जाणू शकत नाही. राजन यांनी स्वतःच्या कार्यकाळात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला होता, असा दावाही सुब्रमण्यम यांनी केला आहे.

सुब्रमण्यम यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर जोशी यांनी राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्याचा आणि त्याच्या सदस्यांना वाढत्या एनपीएच्या मुद्दय़ावर माहिती देण्याची सूचना केली होती. सप्टेंबर 2016 पर्यंत 3 वर्षे आरबीआय गव्हर्नर राहिलेले राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये  प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत.

Related posts: