|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सत्यशोधन चाचणीसाठी तयार : उपाध्यक्ष

सत्यशोधन चाचणीसाठी तयार : उपाध्यक्ष 

ट्रम्पविरोधी लेखामागे हात नाही : चौकशीस झाला प्रारंभ

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वावर टीका करणारा द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रामधील लेख माझ्या सहकाऱयांनी लिहिलेला नाही. या लेखात माझ्या विभागाचा सहभाग नसल्याची 100 टक्के खात्री आहे. तसेच याकरता सत्यशोधन चाचणीला तोंड देण्याची आपली तयारी असल्याचा दावा उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी केला आहे.

ट्रम्प प्रशासनाशी संबंधित एका अधिकाऱयाने काही दिवसांपूर्वी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये ‘आय ऍम पार्ट ऑफ रेजिस्टेन्स इनसाइड द ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन’ नावाने लेख लिहिला होता. ट्रम्प यांचे निर्णय अमेरिकेसाठी नुकसानीचे ठरू शकतात. ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आल्याचे लेखात नमूद करण्यात आले होते. हा लेख निनावी असल्याने लेखकाचे नाव अद्याप उघड झालेले नाही.

उपाध्यक्षांचा कर्मचारीवर्ग या लेखामागे नसल्याची मी हमी देतो. मी माझ्या कर्मचाऱयांना चांगलाच ओळखतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी देशवासीयांसाठी सुरू केलेली कामे पुढे नेण्यासाठी सर्व अधिकारी झटत आहेत. वादग्रस्त लेखाबद्दल केले जाणारे सर्व आरोप खोटे असल्याचे पेन्स म्हणाले.

पेन्स यांच्यावर सर्वाधिक सट्टा

लेखाच्या दोन दिवसांनी अमेरिकेत सट्टेबाजांनी संबंधित अधिकाऱयाच्या नावावरून सट्टा घेण्यास प्रारंभ केला. यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यावर सर्वाधिक संशय व्यक्त होतोय. या लेखाच्या लेखकामागे पेन्स असू शकतात, असे अमेरिकेच्या राजकीय विश्लेषकांचे देखील मानणे आहे.

ट्रम्प यांचे चौकशीचे आदेश

अध्यक्ष ट्रम्प यांनी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये स्वतःच्या विरोधात छापले गेलेल्या लेखाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीची जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ जस्टिसचे ऍटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेबद्दल तडजोड करणाऱया अधिकाऱयाचे नाव सेशन्स समोर आणतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.