|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीबीएसचे अध्यक्ष मूनवेस यांचा राजीनामा

सीबीएसचे अध्यक्ष मूनवेस यांचा राजीनामा 

अमेरिकेतील दिग्गज प्रसारमाध्यम समूह : लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेतील दिग्गज प्रसारमाध्यम समूह सीबीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली मूनवेस (68 वर्षे) यांनी राजीनामा दिला आहे. मीटू मोहिमेंतर्गत महिलांनी मूनवेस यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आरोप होण्यापूर्वी मूनवेस यांना हॉलिवूडमध्ये मोठा सन्मान प्राप्त होता. न्यूयॉर्कर नियतकालिकाने छापलेल्या लेखांद्वारे 12 महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

सीबीएसने मूनवेस यांना अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून हटविण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मूनवेस आणि त्यांची कंपनी मीटू मोहिमेसाठी 20 दशलक्ष डॉलर्सची देणगी (145 कोटी रुपये) देणार होते, परंतु त्यापूर्वीच हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला.

आर्थिक लाभ गमविणार

मूनवेस यांच्या जागी सध्या जेसेफ इयानिएलो यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मीटू मोहिमेसाठी दान केली जाणारी रक्कम मूनवेस यांच्या देयकातून वजा केली जाणार आहे. मूनवेस यांच्यावर झालेल्या आरोपांची एका कायदाविषयक कंपनीकडून चौकशी केली जातेय. नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळणारे सर्व आर्थिक लाभ रोखून ठेवले जाणार आहेत. भविष्यात मिळणाऱया आर्थिक लाभाबद्दलचा निर्णय अहवालाच्या आधारावर घेतला जाईल. कंत्राटानुसार मूनवेस यांना मिळणारी रक्कम 100 ते 180 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना लाभांश देखील मिळणार नाही.

पुलित्झर विजेत्याकडून खुलासा

जेसिका पेलिंग्टन नावाच्या महिलेने पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार रोनेन फॅरो यांना मूनवेस यांच्या दुष्कृत्यांची माहिती दिली होती. पुढील काळात फॅरो यांनी आरोपांवर आधारित लेख न्यूयॉर्कर नियतकालिकात छापला होता. फॅरो यांनीच हॉलिवूडचे प्रख्यात निर्माते हार्वे वीनस्टीन यांनी केलेल्या गुन्हय़ांचा खुलासा केला होता. यानंतरच महिलांनी मीटू मोहीम चालविली होती. मूनवेस यांनी 1995 मध्ये सीबीएस टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या टीमने अनेक प्रख्यात कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. 1998 मध्ये कंपनीने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तर 2003 मध्ये अध्यक्षपद सोपविले होते.