|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘भारत बंद’साठी विरोधक रस्त्यावर

‘भारत बंद’साठी विरोधक रस्त्यावर 

उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचा काँग्रेसचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही राज्यांमध्ये बंदला हिंसक वळण लागले. वाहनांची तोडफोड, रेलरोको आणि पेट्रोलपंपाची नासधूस करण्याचेही प्रकार घडले. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी करकपात करणार नसल्याचा पुनरुच्चार पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी केला

काँग्रेससह 21 पक्षांचा सहभाग असलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. बिहार, मध्यप्रदेशमध्ये बंदला हिंसक वळण लागले. बिहारमध्ये रेलरोकोसह वाहनांची तोडफोड करण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये वाहनांवर दगडफेक करत पेट्रोलपंपाची मोडतोड केली. केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा, अरुणाचलमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. पंजाब, चंदगड आणि हरियाणामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. ओडिशामध्ये रेलरोको आंदोलनामुळे 10 रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या. झारखंड, महाराष्ट्र, मध्यप्रदेशमध्ये रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मिझोराममध्ये अल्प प्रतिसाद मिळाला.

                                     सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत

बंदचा फटका विविध राज्यांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला. कर्नाटक, तेलंगणा, हैदराबाद, बिहारमध्ये काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या रास्तारोको व मोटारसायकल रॅलीमुळे वाहतूक व्यवस्था काहीकाळ ठप्प झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

                             जहानाबादमध्ये बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू

रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाल्याने अत्यवस्थ असणाऱया बालिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. बिहारमधील जहानाबादमध्ये हा प्रकार घडला. रास्तारोकोमुळे बालिकेस रुग्णालयात घेऊन जाणारी रिक्षाही वाहतूक कोंडीत सापडली. वेळेत रुग्णालयात दाखल केले असते तर तिचे प्राण वाचले असते, अशी माहिती बालिकेच्या पालकांनी दिली. तर बंदमुळे हा प्रकार घडला नसल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे.

दरवाढीवर सरकारचे मौन : राहुल गांधी

पेट्रोल दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे. मात्र याबाबत सरकारने कोणतीही उपाययोजना न करता मौन बाळगले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकार केवळ उद्योगपतींची भलावण करत आहे. आज सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटला आहे, असा दावाही त्यांनी केला.

‘केंद्र सरकारकडून करकपात नाहीच’

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर तोडगा म्हणून केंद्र सरकार अबकारी करात कपात करेल, अशी शक्यता व्यक्त होत होती; पण या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात मोठी घट होणार असल्याने कर कपातीचा निर्णय सरकार तूर्तास तरी घेणार नाही, असे सूत्रांनी सोमवारी स्पष्ट केले.

इंधन दर कपात सरकारचा अधिकार नाही : रविशंकर प्रसाद

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधन दरवाढीमुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होते. यामध्ये केंद्र सरकारचा थेट संबंध येत नाही. त्यामुळे दरकपात करणे सरकारच्या अधिकारात नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.

बंद 100 टक्के यशस्वी : काँग्रेस

भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोदी सरकारला जनतेने जाब विचारला आहे, असा दावा काँग्रेसचे सुरजेवाला यांनी केला. हुकूमशाही व्यक्तींकडूनच पुढील 50 वर्षे राज्य करण्याची भाषा केली जाते. आज देशातील दोन व्यक्ती लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

देशव्यापी बंदचा फज्जा : भाजप

काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदचा फज्जा उडाला, असा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाची महाआघाडी तोंडघशी पडली आहे. बंदच्या नावाखाली जनतेमध्ये सरकारविरोधात अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही भाजपने केला.

राजस्थान पाठोपाठ आंध्रमध्ये इंधन दरात कपात

आंध्रप्रदेशमध्ये इंधनावर आकारण्यात येणाऱया ‘व्हॅट’मध्ये दोन रुपये कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. आंध्रप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलवर चार रुपये व्हॅट आकारण्यात येत होता. केंद्र सरकारने प्रचंड प्रमाणात दरवाढ केल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी व्हॅटमध्ये दोन रुपये कपात केल्याचेही त्यांनी सांगितले.