|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » इंडिया अ च्या डावात भरतचे शतक

इंडिया अ च्या डावात भरतचे शतक 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

अलूर येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या दुसऱया अनधिकृत कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध इंडिया अ चा पहिला डाव 505 धावांत आटोपला. इंडिया अ संघातील श्रीकार भरतने दमदार शतक (106)   झळकविले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 346 धावा जमविल्या आहेत. इंडिया अ ने 159 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ ने दुसऱया डावात 2 बाद 38 धावा जमविल्या होत्या.

या सामन्यात इंडिया अ ने 3 बाद 223 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. भरत आणि कुलदीप यादव या जोडीने आठव्या गडय़ासाठी 113 धावांची भागिदारी केल्याने इंडिया अ ला पहिल्या डावात 500 धावांचा टप्पा ओलांडता आला. भरतने 186 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 106 तर कुलदीप यादवने 5 चौकारांसह 52 धावा जमविल्या. इंडिया अ च्या डावात समर्थ आणि ईश्वरन यांनी सलामीच्या गडय़ासाठी 174 धावांची भागिदारी केली होती. समर्थने आठ चौकारांसह 83 तर ईश्वरनने 10 चौकारांसह 86 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42, शुभम गिलने 7 चौकारांसह 50 तसेच गौतमने 3 चौकारांसह 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ तर्फे ट्रिमन आणि ऍगेर यांनी प्रत्येकी 3 तर डॉगेट, मार्श आणि स्वेपसन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. इंडिया अ ने पहिल्या डावात 159 धावांची भक्कम आघाडी मिळविली.

ऑस्ट्रेलिया अ च्या दुसऱया डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांची सलामीची जोडी 37 धावांत तंबूत परतली. सलामीच्या पॅटरसनने 4 तर रेनशॉने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19 धावा केल्या. इंडिया अ संघातील गौतम आणि नदीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचा एक दिवस असल्याने इंडिया अ संघाला विजयाची नामी संधी आहे. ऑस्ट्रेलिया अ संघ अद्याप 121 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया अ प.डाव- 109 षटकांत सर्वबाद 346 (मार्श नाबाद 113, हेड 68, पॅटरसन 48, निसेर 44, कुलदीप यादव 5/91, नदीम 3/90), इंडिया प. डाव – 144 षटकांत सर्वबाद 505 (भरत 106, समर्थ 83, ईश्वरन 86, अय्यर 42, गिल 50, कुलदीप यादव 52, ट्रिमन आणि ऍगेर प्रत्येकी 3 बळी), ऑस्ट्रेलिया अ दु डाव -14 षटकांत 2 बाद 38.