|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » जपान ओपन बॅडमिंटनमध्ये सिंधू, श्रीकांतवर भारताची मदार

जपान ओपन बॅडमिंटनमध्ये सिंधू, श्रीकांतवर भारताची मदार 

700,000 अमेरिकन डॉलर्स रकमेच्या स्पर्धेला आजपासून प्रारंभ, सायना नेहवाल, प्रणितची माघार

वृत्तसंस्था/ टोकियो

आशियाई स्पर्धेतील रौप्यविजेती पीव्ही सिंधू आजपासून सुरु होणाऱया जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत आहे. 700,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत भारताची मदार सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांच्यावर असेल. आगामी काळातील व्यस्त कार्यक्रम पाहता सायना नेहवाल व बीसाई प्रणिथ यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

यंदाचे वर्ष सिंधूचे आशादायी राहिले असले तरी एकाही मोठय़ा स्पर्धेचे जेतेपद तिला जिंकता आलेले नाही. राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वअजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा व अलीकडेच झालेल्या आशियाई स्पर्धेतही तिला रौप्यपदकच पटकावता आले आहे. जपान ओपनमध्ये जेतेपद मिळवण्याचा सिंधूचा प्रयत्न असेल. सलामीच्या लढतीत सिंधूसमोर जपानच्या सयाका ताकाहाशीचे आव्हान असणार आहे. सलामीचा अडथळा पार केल्यानंतर उपांत्यपूर्व लढतीत कदाचित सिंधूसमोर ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन किंवा जपानची स्टार खेळाडू अकाने यामागुचीचे आव्हान असण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेतील कांस्यविजेती सायना नेहवालने मात्र या स्पर्धेतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

पुरुष गटात किदाम्बी श्रीकांत व एचएस प्रणॉय यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. श्रीकांतची सलामीची लढत चीनच्या हुआंगशी होईल. प्रणॉयसमोर इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीचे तर युवा खेळाडू समीर वर्मासमोर कोरियाच्या ली डोंगचे आव्हान असणार आहे. याशिवाय, पुरुष दुहेरीत राष्ट्रकुल रौप्यविजेत्या सात्विकराज व चिराग शेट्टी तर मनु अत्री व बी सुमित रेड्डी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी ही जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल.