|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पगारी पुजारी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक बोलावणार

पगारी पुजारी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक बोलावणार 

देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांची पुजारी हटाव संघर्ष समिती शिष्टमंडळाला ग्वाही.

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीवर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत तातडीने बैठक बोलावू जाईल, अशी ग्वाही देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला रविवारी दिली. कायदा अमंलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी संघर्ष समितीने जाधव यांची त्यांच्या तटाकडील तालमीजवळील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी सध्याच्या पुजाऱयांना अंबाबाई मंदिरातच ठेवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले जात आहे, असा संघर्ष समितीने आरोप केला.

  अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून त्यांच्या जागी पगारी पुजारी नेमण्यासाठी कायदा केला. तसेच देवस्थान समितीने इच्छूक पुजाऱयांच्या मुलाखतीही घेतल्या. मात्र कायदा होऊन सहा महिने आणि मुलाखती होऊन तीन महिने झाले तरी पुजाऱयांची नेमणूक का झालेली नाहीत. याचा जाब संघर्ष समितीने देवस्थान समिती अध्यक्ष जाधव यांना विचारला. प्रारंभी इंद्रजित सावंत म्हणाले, कायदा अस्तित्वात येऊन 6 महिने उलटली तरीही अंमलबजावणी का होत नाही, याची माहिती जाधव यांनी सांगावी. संजय पवार म्हणाले, पुजारी नेमण्याबाबतचा विषयच केवळ ठोस कृतीमुळे बाजूला पडत आहे. भाविक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. काही जणांचा तर संघर्ष समितीचे आंदोलक मॅनेज झाले असावेत, असा समज झाला आहे.

   दिलीप पाटील म्हणाले, जेव्हा कायदा अस्तित्वात आला, तेव्हाच अंबाबाई मंदिरातील पुजाऱयांचे अधिकारी रद्द झाले आहेत. असे असूनही सध्या पुजारी अंबाबाईची पूजा करुन सर्व उत्पन्न घरी नेत आहे. या उत्पन्नावर त्यांचा अधिकारच नाही. तेव्हा त्यांच्याकडून दागिने व पैसे काढून घेऊन देवस्थान समितीत जमा करावेत. शरद तांबट म्हणाले, कायद्याची अमंलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटस्थापनेपर्यंत अंमबजावणी व्हावी, अशी संघर्ष समितीच नव्हे तर लोकांची भावना आहे. वसंतराव मुळीक म्हणाले, लोकभावनांचा विचार न केल्यानेच अंमलबजावणीला दिरंगाई होत आहे. आर. के. पोवार यांनी कायदा केला असला तरीही त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी करणार हे ठरविण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक व्हावी, असे सांगितले. 

   सर्वांचे म्हणणे ऐकून जाधव म्हणाले, कायदा अंमलबजावणीचे काम सुरुच आहे. राज्याच्या प्रधान सचिवांसोबत चार बैठकाही झाल्या आहेत. कायदा बाजूला पडल्याचा गैरसमज करुन घेऊन नये. मुलाखती दिलेल्यापैकी ज्यांना पुजारी म्हणून निवडले जाईल, त्यांना अंबाबाईच्या पुजेबाबत प्रशिक्षण देऊ, असेही जाधव म्हणाले. यावेळी सुरेश साळोखे, ऍड. चारुलता चव्हाण, प्रताप नाईक आदी उपस्थित होते.

तेव्हा संघर्ष समिती कुठे होती…

देवस्थान समितीकडून इच्छूक पुजाऱयांच्या घेतलेल्या गेलेल्या मुलाखतींविराधात काही जण न्यायालयात गेले होते. तेव्हा संघर्ष समिती कुठे होती. समितीने न्यायालयात जाणाऱयांना का जाब विचारला नाही, असा प्रतिप्रश्न देवस्थान समिती अध्यक्ष जाधव यांनी संघर्ष समितीला केला. यावेळी मुलाखतीच्या विरोधात न्यायालयात जाणे चुकीचे असून संघर्ष समिती त्याचा निषेध करत आहे, असे बाबा पार्टे यांनी सांगितले.