|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आया-बहिणींच्या पाळबळावरच मुश्रीफांचे नेतृत्व बहरले

आया-बहिणींच्या पाळबळावरच मुश्रीफांचे नेतृत्व बहरले 

प्रतिनिधी/ कागल

पाळण्याची दोरी हातात धरणाऱया राज्यातील महिलांना शरद पवारांनी तिरंगा झेंडय़ाची दोरी हातात दिली. त्यांना समान हक्क, समान अधिकार देत 50 टक्के आरक्षण दिले. पवारांनी महिलांचा राज्यात मान-सन्मान केला. परंतू भाजपच्या सत्ताकाळात महिलांच्यावर मोठय़ा प्रमाणात अत्त्याचार होत आहेत. आज राज्यात महिला सुरक्षित नाहीत. या प्रवृत्तीला सत्ताधाऱयांनी खातपाणी घातले म्हणून या सत्ताधाऱयांना खाली खेचण्याची वेळ आली आहे. याच महिलांना हसन मुश्रीफ यांनी देखील शरद पवारांप्रमाणेच सन्मान दिला. याच आया-बहिणींच्या पाठबळावर आमदार हसन  मुश्रीफ यांचे नेतृत्व बहरले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीच्या महिला                 प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी काढले.

कागल विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील गैबी चौकात आयोजित केलेल्या भव्य महिला मेळाव्यात सौ. वाघ बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. संगिता खाडे, पचायत समितीच्या सभापती राजश्री माने, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, कागल विधानसभा महिला अध्यक्षा सौ. शिलाताई जाधव, महिला तालुकाध्यक्ष मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप सरकारचा समाचार घेताना सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या, 2014 मध्ये भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यामध्ये गॅस, पेट्रोल-डिझेल, टोलमुक्ती, कर्जमाफी, बेरोजगारी, आरक्षण, खड्डेमुक्ती, महिला सुरक्षा, निराधार पेन्शन याबाबत दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाहीत. आज जनता महागाईने त्रस्त झाली आहे. रेशनिंगचा भोंगळ कारभार सुरु आहे. गरीबांच्या तोंडचा घास त्यांनी काढून घेतला आहे. मोदींनी बेटी बचाओचा नारा दिला तर त्यांच्याच पक्षाचे आमदार बेटी भगाओचा नारा देतात. परिणामी राज्यामध्ये महिलांच्यावर अत्त्याचार वाढत आहेत. विनयभंग, अश्लिलता, छेडछाडीला महिलांना समोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींना सत्ताधारी खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे रामाचं नाव घेवून भाजप सत्तेवर आले परंतू हे रामराज्य नसून रावण राज्य आहे, असा घणाघात केला.

त्या म्हणाल्या, नोटाबंदी, जीएसटी यामुळे राज्याचे त्यांनी वाटोळे केले आहे. समाज या सत्ताधाऱयांच्या विरुध्द निराश झाला आहे. खोटे बोल पण रेटून बोल असे म्हणणाऱया  या सरकारला आता हाकलून देण्याची वेळ आली आहे. राम कदमासारख्या विकृत माणसाने महिलांविषयी काढलेल्या अनुद्गाराबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर कलम 363, 163 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन करत आम्ही मात्र महिलांबाबत त्यांच्या संरक्षणाचे, समानतेचे, त्यांच्या हक्काचे धोरण अवलंबले. शरद पवार यांनी तर राज्यातील महिलांना मोठा सन्मान दिला. त्यामुळे राज्यातील महिलाशक्ती राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. त्यामुळेच कागल तालुक्यातील महिला शक्ती ही येत्या निवडणुकीत                  मुश्रीफांच्या पाठिशी राहून त्यांना विक्रमी मतांनी निवडून देईल.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गेल्या वीस वर्षात आणि 15 वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात महिलांच्या ताकदीमुळेच मी मोठा झालो. ही ताकद माझ्या पाठिशी नसती तर मी आमदार झालो नसतो. त्यामुळेच मी प्रथम आमदार झाल्यापासून दारिद्र्य रेषेखाली कुटूंबांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी पेन्शन, अन्नसुरक्षा, मोफत शस्त्रक्रिया तसेच गोरगरीबांच्या शासनाच्या अनेक योजना त्यांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम केले. आज राज्यात मी बदललेल्या कायद्यामुळे 82 लाख लोकांच्यावर मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सुमारे 2 हजार कोटीपेक्षा अधिक खर्च यासाठी आला आहे. त्यामुळेच मला कागल तालुक्यात श्रावणबाळ म्हणून ओळखले जाते, हे स्पष्ट करुन भाजपने जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. 2014 च्या पूर्वी रामदेवबाबा, अण्णा हजारे यांनी महागाईबाबत ओरड केली होती. मात्र भाजपच्या सत्ताकाळातील आजची प्रचंड वाढलेली महागाई पाहता आज ते दोघेही गप्प का ? असा सवाल उपस्थित केला. आज देशात मोदी सरकारच्या काळात 41 हजार कोटीचा राफेल विमान घोटाळा झाला आहे. यासारखे अनेक घोटाळे देशात आणि राज्यात झालेले आहेत. राज्यातील भाजपचे राम कदम, प्रशांत परिचारक, छिंदम यांची वक्तव्ये म्हणजे संपत्ती आणि सत्तेची मस्ती आहे. यावेळी भाजप आणि शिवसेना युतीबाबत उपाहसात्मक टीका करुन येत्या निवडणुकीत मला पुन्हा संधी द्या मिळालेल्या सत्तेचे सोने करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, पं. स. सभापती सौ. राजश्री माने, आमरीन मुश्रीफ, शिलाताई जाधव, संजना तोडकर, सुजाता फराकटे, सरपंच शितल फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि कोल्हापूरी गूळ देवून सत्कार केला. तर तालुक्यातील समस्त महिलाभगिनींनी मुश्रीफांना राखी बांधून त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, महिला शहर अध्यक्षा पद्मजा भालबर, मुरगूड शहराध्यक्षा शौभा परीट, गडहिंग्लज बाजार समिती उपसभापती सुमन लकडे, गडहिंग्लज शहर महिला अध्यक्षा शर्मिला पोतदार, जिल्हा महिला उपाध्यक्षा आशा जगदाळे, दीपा कुदळे, बिद्रीच्या संचालिका अर्चना पाटील, जि. प. सदस्या सौ. शिल्पा खोत, पंचायत समितीच्या सदस्या अंजना सुतार, शिक्षण सभापती अलका मर्दाने, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा मंजुषा कदम यांच्यासह आमदार मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ, सून नबिला मुश्रीफ यांच्यासह तालुक्यातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.