|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ात बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हय़ात बंदला संमिश्र प्रतिसाद 

प्रतिनिधी/ सांगली

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला जिह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबर इतर 22 पक्षांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला होता. सांगली शहरातून कॉंग्रेसच्यावतीने  मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. तासगाव, शिराळा, आष्टा या शहरांमध्ये सरकारच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. जिह्यातील एस. टी. वाहतूकही सकाळी काही काळ बंद ठेवण्यात आली होती. महागाई वाढत आहे. सामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. तसेच रुपयाची सातत्याने घसरण सुरुच आहे. भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. या अपयशी सरकाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता.

पेट्रोल, डिझेल गॅस सिलिंडरचे भाव चढय़ादराने वाढताहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला असून महागाईच्या  आगडोंब वाढला आहे. यामध्ये जनता होरपळत आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.  पेट्रोलचा दर गगनाला भिडला आहे. तो आता शंभर रूपये इतका होत आला आहे. डिझेल दर दररोज वाढत आहे. त्यामुळे महागाई वाढतच राहणार आहे. मे 2017 मध्ये पेट्रोलचा दर 86 रूपये इतक्या उच्चांकावर होते. या आठवडय़ात पेट्रोलच्या दराने नवा विक्रमच केला आहे. अमेरिका सारख्या देशात पेट्रोलचा भाव 45 रूपये प्रती लिटर इतका आहे. या इंधनाच्या दरवाढीबाबत केंद्र सरकार कोणताची निर्णय घेत नाही, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच ही महागाई भडकली आहे.

सांगलीत काँग्रेसचा मोर्चा

शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने सांगली शहरात सकाळी मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, मागील चार वर्षात या सरकारने 12 लाख कोटी रुपयाचा टॅक्स वसूल केला जनता मात्र महागाईच्या आगीत होरपळते आहे. इंधनाचे दर जीएसटीखाली आणण्याची कृती हे सरकार करीत नाही. एका बाजूला इंंधनावरील मिळणारा महसूल सोडण्यास सरकार तयार नाही. यासाठी भारत बंद अशी भूमिका काँग्रेस पक्षाला घ्यावी लागत असल्याची टीका करण्यात आली.

गोरगरिबांचा सणासुदीच्या तोंडावर खिसा फाटका करण्याचे काम भाजप सरकारकडून करण्यात येत असल्याची टीका करण्यात आली. आगामी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांना महागाईची झळ बसणार आहे. सरकार पेट्रोल, डिझेल गॅसचे दर कमी करू शकणार नसल्याचे स्पष्ट दिसते. जनता त्रस्त आहे. जन आक्रोश सरकारला ऐकू येत नाही.

 या भारत बंद मोर्चाला काँग्रेस भवनापासून सुरू झाली मोर्चा गणपती पेठ, मारूती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एस. टी. स्टँड रोड, सिव्हिल हॉस्पिटल, राममंदिर या मार्गे जाऊन काँग्रेस कमिटी येथे समारोप करण्यात आला. यामध्ये पृथ्वीराज पाटील, प्रभारी प्रकाश सातपुते, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, वहिदा नायकवडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाजार बंद

काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये काही दुकानदारांनी सहभाग घेत दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवली होती. पण, गणेशोत्सवाचा सिझन सुरू असल्याने अनेकांनी मात्र या बंदकडे दुर्लक्ष करून त्यांनी अर्धी शटर उघडी ठेवून दुकाने सुरू ठेवली होती. तसेच मार्केट यार्डातही काही बंद तर काही दुकाने सुरू होती.