|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चाळकेवाडी पठार पर्यटकांना खुणावतंय..!

चाळकेवाडी पठार पर्यटकांना खुणावतंय..! 

सृष्टीचं देखण रूप..! पवनचक्क्यांचे पठार निसर्गसौंदर्याने फुलले, चाळकेवाडी पठारावर फुलांचा गालिचा

वार्ताहर/ परळी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे श्रावण महिन्याचा शेवट झाला असला तरी हे शब्दच जणू सौंदर्याची अनूभुती असलेला आहे. वर्षा ऋतूत हिरवागार निसर्ग या श्रावणाची नजाकत वाढवून गेला. सारी सृष्टी पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघालेली असून सृष्टीतील सुरेख सौंदर्य तिचं प्रत्येक रूप मनाला वेडावणार आहे. असाच काहीसा निसर्ग सौंदर्याने नटलेले परळी खोरे जणू पर्यटकांना साद घालत आहेत. डोंगराने नेसलेला हिरवा शालू, त्यांच्या डोक्यावर धुक्याची टोपी अन् ऊन पावसांचा सुरू असणारा लपंडाव, पावसाने भिजलेली चिंब ओली पहाट, वाकडय़ा तिकडय़ा पसरलेल्या निसडय़ावाटा, चकचकीत पाऊलवाटा, रस्त्याच्या दोन्ही बाजुला पसरलेली गर्द हिरवाई, दुधाप्रमाणे फेसाळणारे धबधबे, खळखळ करीत वाहणारे ओढेनाले याची मजा  काही औरच असते…!  ठोसेघर, कास, उरमोडी, सज्जनगड यांसारख्या अनेक प्रसिद्ध ठिकानाबरोबरच त्याच्या कुशीतून डोकेवर काढत असलेले चाळकेवाडीचे फुलांनी बहरलेल पठार पर्यटकांना भुरळ पाडत आहे…

   कास प्रमाणेच चाळकेवाडीच्या विस्तीर्ण पाठरावरही आता फुलांचे गालिचे बहरू लागले आहेत. या परिसरात आल्यावर जणू काश्मिरात आल्याचा भास होत असून या पठारावर दररोज शेकडो पर्यटक भेट देत आहेत. मात्र वनखाते तसेच स्थानिक ही याबाबत अनभिज्ञ असल्याने पर्यटकाना निसर्ग सौंदर्याचा हा खजिना विनाशुल्क लुटता येत आहे. निळ्या, पिवळ्या, लाल आदी फुलांचा रंगीबेरंगी गालिचा पांघरलेले कास पठार पाहण्यासाठी हजारोंची गर्दी दररोज होत आहे. असाच रंगीबेरंगी गालिचा चाळकेवाडी पवारवाडी, चिखली, परिसरातील विस्तीर्ण पठारावर पर्यटक, संशोधकांना निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. कास पठारावर आढळणाया रानफुलांच्या प्रजाती पैकी अनेक प्रजाती या पठारावर आढळून येत आहे.

  कास पठारावर अनेक प्रजातींची वनस्पती, फुले आढळून येतात सौंदर्य खुलवणाऱया रानफुलांच्या जाती फुलतात आणि नष्ट होऊन जातात. अशाच प्रकारची फुले चाळकेवाडी पाठरावरही आढळून येत आहेत. कवला, लाल गोंधणी, निळवंती, एक दांडी, आशा अनेक प्रकारची प्रजाती या परिसरात पर्यटकांना आकर्षित करत आहेत. निसर्गरम्य ठोसेघर धबधबा विस्तीर्ण पवनचक्क्यांचे पठार, कोयना, तारळी धरणाचे ब्याक वॉटर दाट धुके, खळखळून वाहणारे पाण्याचे झरे, विविध प्रकारचे पक्षी मोर यामुळे या ठिकाणी आलेले पर्यटक निसर्गाशी एकरूप होत आहेत. विविध फुलांचा खजाना

सायनोटिस, प्यॅसेप्लोरा, विघ्ना, एरिड्स, इफिजिनिया, कॅथेलीना, एक्सीटासीचा, ग्लोरिओसा या प्रकारची अनेक फुले बहरली आहेत. या फुलांबरोबरच या पठारावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पची सीमारेषा आहे. कोयनेचे ब्याक वॉटर तसेच पाटण सातारा तालुक्यातील हद्दी आहेत. या परिसरात उपद्रवी हुल्लडबाजी करणाऱया पर्यटकांवर आवर घालण्यासाठी पोलीस दल, वनखाते, स्थानिक ग्रामस्थांनी कृती आराखडा तयार केल्यास पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता येईल अशी मागणी निसर्गप्रेमीं व्यक्त करीत आहेत.

पाहण्यासारखी ठिकाणे…!

1) दाटधुके समोर असलेला विस्तीर्ण पवनचक्की फुलांच्याध्ये असलेले पाण्याचे तळे जणू काश्मीरचीच आठवण करून देते.

2)दुसऱया बाजूला गर्द हिरवाई व त्यातून दिसणारी तारळी धरणाची पाण्याची फुगी निसर्ग सौंदर्य आणखीच भर घालते. या बहरलेल्या निसर्गसौंदर्यचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

3) पवारवाडी, मोरेवाडी फाटय़ावरून पाडेकरवाडी रस्त्यावर आसलेल्या पवनचक्क्यानच्या विस्तीर्ण पठारावरील विविध रंगी फुलांचा फुलोराच पहावयास मिळतो.

1) पांगारे गावाकडे जाणाऱया सती आईच्या मंदिरापासून पुढे गेल्यावर विस्तीर्ण पठारावर गालिचा तसेच अनेक प्रकारची फुले पर्यटकांना मोहित करत आहेत.

4) ठोसेघर धबधब्यापासून पुढे गेल्यावर सातारा-चिपळूण या रस्त्यावर पवनचक्क्यांचे विस्तीर्ण पठार आहे.

Related posts: