|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुलीचे अपरहरण केलेला आरोपी मंगळूरात जेरबंद

मुलीचे अपरहरण केलेला आरोपी मंगळूरात जेरबंद 

मंगळूर पोलिसांची कारवाई,  10 महिन्यानंतर आरोपीला अटक

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीने 3 वर्षीय मुलीचे अपहरण करताना छायाचित्र टिपलेल्या आरोपीला पकडण्यास पोलिसांना तब्बल 10 महिने लागले. या आरोपीला मंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. मडगावच्या कोकण रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

11 महिन्यापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावरुन 3 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. कर्नाटकातील मंगळूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मंगळूर पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचे नाव रिझवाझ काळू इंदु (35) असे असून हा आरोपी भोपाळ येथील आहे. सध्यातरी ही अपहृत मुलगी मडगाव रेल्वे पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

पार्श्वभूमी

31 ऑक्टोबर 2017 रोजी हुबळी येथील एक गरीब कुटूंब मडगाव रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी या कुटूंबाकडे एकूण चार मुली होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला सर्वजण झोपले तसा आरोपा रिझवान हाही या कुटूंबाबरोबर झोपला होता. झोपेचे सोंग घेतलेल्या या आरोपीने 31 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री 11.20 वाजता या लहान मुलीच्या अंगावर चादर लपेटली आणि तिला आपल्या खांद्यावर घेऊन 11.45 वाजता आलेल्या एका रेल्वेतून मुंबईत गेला.

मुंबईतील बांद्रा  रेल्वे स्थानकावर तो या मुलीसह उतरला आणि गायब झाला. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा पत्ता बांद्रापर्यंत सापडला. मात्र पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी गायब झाला होता.

आरोपीने दुसरी रेल्वे पकडली आणि आरोपी गुजरात राज्यातील सुरत येथे आला. तेथे थोडा वेळ घालवल्यानंतर आरोपीने दुसरी रेल्वे पकडली आणि भोपाळ येथे आला. भोपाळ हा या आरोपीचा गाव. या मुलीला घेऊन आरोपी भोपाळ येथे भीक मागू लागला तेव्हा तेथील पोलिसांना संशय आला.

भोपाळ पोलिसांनी आरोपीकडे या मुलीसबंधी चौकशी केली तेव्हा या आरोपीने ही आपली मुलगी असल्याची थाप मारली. तिचा जन्म कोठे झाला अशी भोपाळ पोलिसांनी विचारणा केली तेव्हा आरोपी गडबडला आणि त्याने या मुलीच्या जन्मासंबंधीची कागदपत्रे आण असे आरोपीला फर्मावले आणि भोपाळ पोलिसांनी या मुलीची रवानगी भोपाळ येथील ‘चिल्ड्रन्स होम’ येथे केली. मात्र आरोपी काही या मुलीच्या जन्मासंबंधीची कागदपत्रे आणू शकला नाही.

आरोपीला दिले होते हाकलून

 

31 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री वरील आरोपीने या मुलीचे अपहरण केले होते. त्यापूर्वी, हा आरोपी कर्नाटकातील मंगळूर रेल्वे स्थानकावर होता. प्राप्त माहितीनुसार मंगळूर रेल्वे स्थानकावरुन लहान मुलीचे अपहरण करण्याचा या आरोपीचा बेत असावा.

मात्र मंगळूर रेल्वे पोलिसांनी या आरोपीला तेथून हाकलून लावले होते आणि हाच आरोपी नंतर एका रेल्वेत बसून मडगाव रेल्वे स्थानकावर आला होता आणि मडगाव रेल्वे स्थानकावरुन या मुलीचे अपहरण केले होते.

 

बोलता येत नसल्याचा  आरोपीचा ढोंगीपणा

भोपाळ पोलिसानी या आरोपीकडून 3 वर्षीय मुलीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपी काही दिवसांनी पुन्हा मंगळूर रेल्वे स्थानकावर आला. मडगाव रेल्वे पोलिसांनी 10 महिन्यापूर्वी सीसीटीव्हीने टिपलेल्या या आरोपीचे छायाचित्र सर्वत्र पाठविले होते. आरोपी रिझवाज याला पाहताच मंगळूर पोलीस सावध झाले आणि या आरोपीला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यासाठी आरोपीला बोलते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने आपल्याला बोलता येत नसल्याचे खुणेनेच सांगितल्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला बोलते करण्याचा नाद सोडून दिला.

आरोपीला ताब्यात घेतल्याची खबर मंगळूर पोलिसांनी मडगावच्या कोकण रेल्वे पोलीस स्थानकाला दिली. कोकण रेल्वे स्थानकावरील काही पोलीस मंगळूर येथे जाऊन त्यांनी 3 वर्षीय मुलीचे अपहरण केलेल्या या आरोपीला ताब्यात घेतले. त्याला मडगावात आणत असताना वाटेत हा आरोपी या पोलिसांकडे खुल्लमपणे बोलत होता. मंगळूर पोलिसांना ही खबर कळली तेव्हा आरोपीने कसे फसविले याची चर्चा तेथे सुरु झाली. ही सर्व माहिती कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राम आसरे यांनी पत्रकारांना दिली.

पोलीस भोपाळकडे

आरोपीने अपहरण केलेली मुलगी सध्या भोपाळ येथील ‘चिल्ड्रन्स होम’ येथे आहे आणि तिला घेऊन येण्यासाठी सध्या कोकण रेल्वेपोलीस भोपाळला गेलेले आहेत.

Related posts: