|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रदूषणावर नियंत्रण ठेऊन गणरायांचे स्वागत करुया !

प्रदूषणावर नियंत्रण ठेऊन गणरायांचे स्वागत करुया ! 

प्रतिनिधी/ फोंडा

गणेशोत्सव हा पर्यावरण संवर्धन व एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आरोग्याला हानिकारक असलेले प्लास्टिक, थर्मोकॉल व प्रदूषणकारी वस्तुंचा कमीत कमी वापर करा. गणपती विसर्जनाच्यावेळी निर्माल्य जलस्रोतामध्ये सोडून देण्यापेक्षा ते एकत्रीत जमा करावे. हे निर्माल्य फोंडा पालिकेकडे जमा केल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केले आहे.

फोंडा पालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. गणपतीचे मखर व इतर सजावटीसाठी थर्मोकॉलचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्यात थर्मोकॉलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. थर्मोकॉल हा प्रदूषणकारी असून त्यापासून पर्यावरण व आरोग्याला धोका निर्माण होत असतो. त्यासाठी हल्लीच फोंडा पालिकेने थर्मोकॉलच्या विल्हेवाटीसाठी रासायनिक प्रक्रिया अवलंबात आणली आहे. फोंडा वासियांनी थर्मोकॉल उघडय़ावर फेकून न देता किंवा जाळून टाकण्यापेक्षा ते पालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागात जमा करावेत. गणपती विसर्जनानंतर देवाच्या अंगावरील फुले म्हणजेच निर्माल्य पाण्यात सोडून दिले जाते. काही लोक प्लास्टिक पोतीत बांधून हे निर्माल्य नदीत फेकून देतात. निर्माल्य विसर्जन हा आपल्या परंपरेतून आलेला भावनिक भाग असला तरी, गणपती विसर्जनानंतर मोठय़ा प्रमाणात फुलांचा खच पाण्यावर तरंगत असतो. मोजक्याच फुलांचे विसर्जन करुन उरलेली फुले फोंडा पालिकेकडे जमा केल्यास त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात येईल.

वाढती वाहने व इतर प्रदूषणामुळे फोंडा शहर दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालले आहे. गणेशोत्सवाच्या काळात फटाकांच्या अति वापरामुळे या प्रदूषणात भर पडणार आहे. फटाक्यांच्या धुरांमुळे होणारे प्रदूषण फुफ्फुसांच्या आजारांना निमंत्रण देणारे आहे. त्वचा रोगही होऊ शकतात. फटाक्यांपासून होणारे ध्वनी प्रदूषणाचा लहान मुले, वयस्क नागरिक व आजारी लोकांना त्रासदायक आहे. फोंडा शहरातून गणपती विसर्जन मिरवणुका काढताना वाटेत बरीच इस्पितळे लागतात. तेथे उपचार घेणाऱया रुग्णांना व आजारी लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. गणेशोत्सव हा आनंद देणारा, समृद्धी व ऐश्वर्य देणारा उत्सव आहे. त्यासाठी पर्यावरण व आपल्या आरोग्याची काळजी घेऊन गणरायाचे स्वागत करुया.