|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भीमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी

भीमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी 

प्रतिनिधी/ मडगाव

पुणे पोलिसांनी देशभर धाडी टाकून फादर स्टॅनन स्वामी, सुधा भारद्वाज, वरवरा राव, व्हर्नान गोन्साल्विस व अरूण परेरा यांना अटक केली होती. तसेच डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घरावर छापा मारला होता. या सर्व नक्षली समर्थक असल्याचा आरोप केला जात असला तरी या आरोपात कोणतेच तथ्य नसून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी काल सोमवारी डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी मडगावात केली.

दक्षिणायन अभियान तर्फे ‘विरोधकांची मुस्कटदाबी : कोरगाव भीमा प्रकरणामागील सत्य’ या विषयावर डॉ. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी बोलताना डॉ. तेलतुंबडे यांनी भीमा कोरगाव प्रकरणाचा इतिहास कथन केला. जानेवारी महिन्यात पुण्यात भीमा कोरगाव प्रकरणात दंगल घडली होती. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या सर्वांनी अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मात्र, या आरोपात कोणतेच तथ्य नाही. हे सर्वजण विद्यमान राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करीत असल्याने त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हे अटक सत्र राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार का झाला, याचा तपास खोलात जाऊन कुणीच केला नाही. पुण्यात भीमा कोरगाव या इतिहासिक प्रकरणाला जानेवारी महिन्यात 200 वर्षे पूर्ण होत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली होती. त्याला विरोध करण्यासाठी दलित, इतर मागासवर्गीय व मराठे एकत्र आले. दलित व मराठे प्रथमच एकत्र आल्याने, त्याचे जबरदस्त राजकीय परिणाम निर्माण होण्याची भीती सरकारला होती. त्यातूनच हा हिंसाचार घडला होता असा दावा डॉ. तेलतुंबे यांनी केला.

पण, ज्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली, त्याचा हिंसाचाराशी कोणताच संबंध नव्हता. ते केवळ दलितांची बाजू घेत होते म्हणूनच त्यांच्यावर सूड उगविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या गोव्यातील घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी आपण गोव्यात नव्हतो. मुंबईत असताना हा प्रकार घडला, त्यामुळे आपल्या बायकोला तातडीने गोव्यात यावे लागले. तिने अगोदर डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली. त्याच बरोबर आपण मुंबईत तक्रार नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी देशाची वाताहात केल्याचा आरोप करून डॉ. तेलतुंबे म्हणाले की, या सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱया प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. मोदी सरकारने दलित समाजाला अक्षरशा वाळीत टाकले आहे. पण, दुसऱया बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. सरकारचे हे दुटप्पी धोरण आहे.

मुसोलोनी ही हुकूमशाही पद्धतीने वागले, त्याच पद्धतीने केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार वागत आहे. त्यांना पूर्ण देश हिंदूत्ववादी करायचा होता. पण, त्यांना ते शक्य झालेले नाही. या देशात निधर्मी पद्धत आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील लोक या ठिकाणी एकत्र रहातात. त्यामुळे प्रखर हिंदूत्ववाद या ठिकाणी येऊच शकत नाही. तरी सुद्धा भाजप व आरएसएस तसे प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

हल्लीच भाजपचे अध्यक्ष अमीत शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात भाष्य करताना, पुन्हा भाजपला सत्ता मिळाली तर पुढील पन्नास वर्षे मागे वळून पहावे लागणार नसल्याचे विधान केले होते. हे विधान बरेच काही सांगून जाणारे आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात कोणच आवाज उठवू शकणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली आहे. प्रसार माध्ये देखील दबावाखाली असल्याचे विधान त्यांनी केले.

2014 ते 2016 या दरम्यान, देशात रोजगार निर्मिती झाली नाही. स्वतंत्र भारतात असे पहिल्यादाच ते सुद्धा भाजप सरकारच्या काळात घडले. सद्या सरकार इंडिया शायनिंगची जाहीरात करत असले तरी कुठे विकास झालाय ? तरी सुद्धा मोदींचे भक्त सरकारचा उदोउदो करण्यात धन्यता मानतात, कारण कोणत्याही परिस्थितीत त्यांना भाजप सरकारचा पराभव झालेला नको आहे.

सुरवातीला दामोदर मावजो यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर दक्षिणायन अभियानचे दत्ता नायक उपस्थित होते.

Related posts: