|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महागाईच्या विरोधात काँग्रेसची मडगाव-फातोर्डात जागृती

महागाईच्या विरोधात काँग्रेसची मडगाव-फातोर्डात जागृती 

प्रतिनिधी/ मडगाव

घरगुती वापरातील गॅस, पेट्रोल, डिझल, कच्चे तेल, दूध, डाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सर्व सामान्य जनतेने जीवन कसे जगावे असा सवाल निर्माण झाला आहे. मात्र, विद्यमान सरकारला त्याचे काहीच पडून गेलेले नाही. त्यामुळे आत्ता लोकांनीच जागृत होणे आवश्यक बनल्याने काल मडगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रके वितरित करण्यात आली.

सकाळी मडगाव पालिका चौकांत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. त्यानंतर गेल्या चार वर्षात महागाई कशी झाली याचा तपशील देणारी पत्रके लोकांना वितरित केली. मडगावातील पेट्रोप पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते ही पत्रके वितरित करीत होते.

मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, मडगाव गट काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक, नगरसेवक अविनाश शिरोडकर, डॉरिस टेक्सेरा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस तसेच इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महागाईने सद्या कळस गाठला असून जनतेने जागृत होण्याची हीच वेळ आहे. सर्व सामान्य जनतेला या महागाईची जबरदस्त झळ बसली असून लोकांनी महागाईच्या विरोधात पुढे येणे आवश्यक असल्याचे मत आमदार श्री. कामत यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र सरकारने वाढीव दराद्वारे कोटय़ावधी रूपये गोळा केले. या निधीचे काय झाले हे तमाम जनतेला कळणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

दरम्यान, फातोर्डा मतदारसंघात महागाईच्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा काँग्रेसचे यतीन बोरकर तसेच इतर कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन महागाईच्या विरोधातील पत्रके वितरित केली.

केंद्र सरकारने सर्वच वस्तूवर जीएसटी लागू केला आहे. मात्र, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसवर जीएसटी लागू का केला नाही. याचे उत्तर जनतेला द्यायला पाहिजे असे मत गिरीश चोडणकर यांनी मांडले. जर पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसवर जीएसटी लागू केला तर किंमती अर्ध्याहून खाली येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. गोमंतकीय जनतेने जागृत व्हावे व महागाईला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले.