|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रकृतीत सुधारणा, मात्र अशक्तपणा!

प्रकृतीत सुधारणा, मात्र अशक्तपणा! 

मुख्यमंत्र्यांनी सध्या टाळलेय मंत्रालय पण काम सुरुच

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली असली तरीही त्यांना अशक्तपणा असल्याने सोमवारी ते मंत्रालयात जाऊ शकले नाहीत. कदाचित आजही ते मंत्रालयात जाणार नाहीत.

अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांना त्वरित कामाचा सपाटा चालू करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी यावेळी विश्रांती घेणे पसंत केले. सोमवारी त्यांनी आपल्या दोनापावला येथील खाजगी बंगल्यावरून काही फाईल तपासणीचे काम केले. काही अधिकाऱयांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी फाईल्स हातावेगळ्या केल्या. आजही फाईल्स हातावेगळ्या करतील आणि उद्यापासून ते काम हाती घेतील. उद्यापासून राज्यात गणेशचतुर्थी निमित्त जनता उत्साहाच्या व उत्सवाच्या गडबडीत असणार, अशावेळी मुख्यमंत्री पर्रीकर होतील तेवढय़ा फाईल्स हातावेगळ्या करणार आहेत.

झालेले उपचार योग्य दिशेने

यापूर्वी देखील त्यांनी ऐन चतुर्थी उत्सवाच्या काळात हजारो फाईल्स हातावेगळ्या केलेल्या होत्या. तिसऱयांदा अमेरिकेला गेल्यानंतर त्यांची तेथे सखोल तपासणी झाली असता त्यांच्यावर झालेले उपचार योग्य दिशेने झालेले आहेत हे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांची सध्या पचनसंस्था मंदावलेली आहे. त्यामुळे त्यांना काही खाण्याची इच्छा होत नाही. परिणामी आहार कमी जात असल्याने त्यांना अशक्तपणा आलेला आहे. डॉक्टरांनी त्यांना केवळ विश्रांती घ्या, असा सल्ला दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आहारावर अनेक बंधने आलेली आहेत. परिणामी अशक्तपणा वाढलेला आहे. हा अशक्तपणा गेल्याशिवाय त्यांना केमोची इंजेक्शने घेता येणार नाहीत.

गणेशचतुर्थी काळात पुढील 8 दिवस सचिवालय, मंत्रालयात शुकशुकाट असणार आहे. कितीही प्रयत्न केला तरी प्रशासनावर उत्सवाचा परिणाम हा होतोच. त्यामुळे अधिकारी वर्गानेही मुख्यमंत्र्यांना थोडी विश्रांती घ्या, असे सल्ले दिलेले आहेत. उद्या बुधवारी मुख्यमंत्री मंत्रालयात येऊन जातील असा अंदाज आहे.

Related posts: