|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सव मंडळांना बॉन्डची सक्ती सुरूच

गणेशोत्सव मंडळांना बॉन्डची सक्ती सुरूच 

प्रतिनिधी/ बेळगाव

सार्व. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणर नाही, अशी घोषणा पोलीस आयुक्तांनी केली होती. परंतु मंडळांना अध्यापही बॉन्ड देण्याची सक्ती लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अग्नीशमन दलाकडून 5 हजार रु. ची ठेव रक्कम आकारण्याचाही बडगा सुरू झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी झालेल्या बैठकांच्या वेळी पोलीस आयुक्तांनी मंडळांना बॉन्डची सक्ती करणार नाही, असे सांगून त्यांची बोळवण केली होती. मात्र पोलीस स्थानकांमध्ये स्थापन झालेल्या एकखिडकी केंद्रांच्या ठिकाणी अद्यापही बॉन्डचा तगादा लावण्यात येत आहे. या संदर्भात विचारणा करणाऱया मंडळांना बॉन्ड द्यावाच लागेल, असे ठणकावून सांगण्यात येत आहे.

तशातच आता अग्नीशमन दलाने गणेशोत्सव मंडळांना 5 हजार रु. ठेव रक्कम जमा करण्याचा नवीन फतवा काढला आहे. ही रक्कम परतही मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. यामुळे गणशोत्सव मंडळांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. गणपतीच्या आगमनासाठी पूर्व तयारीत गुंतलेल्या गणेश भक्तांसमोर विघ्नांची मालिका निर्माण करण्याच्या प्रशासनाच्या कृतीबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.