|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीला स्थगिती?

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीला स्थगिती? 

धारवाड खंडपीठाकडून स्थगिती मिळाल्याची चर्चा : आरक्षणासंदर्भात 20 रोजी सुनावणी

प्रतिनिधी/ निपाणी

राज्यात 12 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱया नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका नुकताच पार पडल्या. मात्र याठिकाणी न्यायालयीन आदेश होईपर्यंत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुका घेऊ नये असा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला असल्याची चर्चा आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या वृत्ताची निपाणीत चर्चा सुरु होती.

31 मे रोजी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 3 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. याचदिवशी सदर स्थानिक संस्थांसाठी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार निपाणीत सत्तेची मोर्चेबांधणी सुरु होत असतानाच 7 रोजी अचानक नगरविकास खात्याने निपाणीसह राज्यातील 13 नगरपालिका, 15 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आरक्षणात बदल केला. त्यामुळे 32 ठिकाणी सत्तेची गणिते पुन्हा विस्कटली.

आरक्षणातील बदलाविरोधात काहींनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेतली होती. त्यानुसार सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरक्षण बदलातील गोंधळ लक्षात घेऊन राज्यातील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला तात्पुरता बेक लावल्याचे समजते. यासंदर्भात सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र 20 सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

दरम्यान सदर स्थगितीसंदर्भातील वृत्त समजताच सोमवारी सायंकाळी निपाणीत अनेक अफवा उठल्या. आरक्षण बदलले असल्याची अफवाही पसरली. यातून सर्वत्र फोनाफोनी सुरु झाली. मात्र काही वेळातच केवळ स्थगिती मिळाल्याचे समजल्याने काहींनी सुटकेचा निःश्वास सोडला. असे असले तरी स्थगितीमुळे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणार असल्याचे दिसत आहे.