|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद

बेळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद 

बस, मॅक्सीकॅब बंदमुळे खरेदीवर काही प्रमाणात परिणाम

प्रतिनिधी / बेळगाव

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे काँग्रेसने भारत बंदची हाक दिली होती. त्याला इतर राजकीय पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. बेळगावातही विविध संघटनांनी पेट्रोल दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. बेळगावात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या तोंडावरच या बंदमुळे बाजारपेठेवर मात्र काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागाच्या बसेस बंद असल्यामुळे नागरिकांनी शहराकडे येण्याचे टाळले होते. मात्र इतर व्यवहार सुरळीत असल्यामुळे बंदला समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे इतर जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. मॅक्सीकॅब व इतर वाहतूक संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी असल्याचे दिसून आले. ऐन सणासुदीच्या तोंडावरच बंद पुकारल्यामुळे काहीसी नाराजीही व्यक्त होत होती. दुपारपर्यंत बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 4 नंतर काही ठिकाणच्या बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामीण भागातील जनतेने बेळगावकडे पाठ फिरविली होती.

बागेवाडीजवळ काही वाहनांवर दगडफेक

सरकारी कार्यालये, न्यायालये, औद्योगिक क्षेत्र व इतर व्यवसाय मात्र सुरळीत होते. बेळगाव-बागलकोट रोडवरील बागेवाडीजवळ काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवून निदर्शने करणाऱयांना पांगविले. बंद पुकारल्यामुळे दुकानदारांनी दुकानेही सकाळी थोडय़ा उशीराच सुरू केली होती. गणेशोत्सव असल्यामुळे मोठी उलाढाल होणार या आशेत असतानाच हा बंद झाल्यामुळे दुकानदारांतून नाराजी व्यक्त होत होती. सायंकाळी 6 नंतर मात्र बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

ग्रामीण भागातील बसेस तसेच मॅक्सीकॅब बंद होत्या. त्याचा फायदा काही रिक्षा चालकांनी उचलला. दुप्पट भाडे घेऊन रिक्षा चालकांनी संधी साधली आहे. शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये आणि तालुक्मयांमध्ये सर्वत्रच संमिश्र प्रतिसाद मिळाला असून हा बंद काही क्षुल्लक घटना वगळता शांततेत पार पडला आहे.

Related posts: