|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिंडलगा तलावात बुडालेल्या त्या बालकांची ओळख पटली

हिंडलगा तलावात बुडालेल्या त्या बालकांची ओळख पटली 

शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार

वार्ताहर/ हिंडलगा

येथील तलावात बुडून मृत्यू झालेल्या त्या दोन मुलांची ओळख पटली असून दोघेही ज्योतीनगर गणेशपूर येथील रहिवासी आहेत. रोहन भारत खोरागडे (वय 15) व अंश आनंद शिंदे (वय 15) अशी सदर मुलांची नाव आहेत. शनिवारी शाळेला सुटी असल्याने दोघेही पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते. पण काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहन व अंश हे दोघे शनिवारी दुपारी जेवण करून सायकलीवरून बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत ते रात्री घरी परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी कॅम्प पोलिसांकडे धाव घेतली व बेपत्ता असलेली फिर्याद दिली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा त्या दोघांचा शोध सुरू होता. या दरम्यान, सायंकाळी उशीरा हिंडलगा गावच्या पाठिमागील असलेल्या तलावात सुरुवातीला एका मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही शेतकऱयांनी पाहिले. सदर माहिती गावात सर्वत्र पसरल्याने तलावा शेजारी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पण कोणाचा मृतदेह आहे याबाबत खात्री होत नसल्याने कॅम्प पोलिसांना कळविण्यात आले. पण सदर हद्द आपल्या कक्षेतील नसल्याचे कारण सांगून पोलीस माघारी गेले. त्यांनतर ग्रा.पं. सदस्य रवी कोकीतकर व इतरांनी पुन्हा बेळगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. रात्री उशीरा दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. कपडे व मृतदेहावरून कुटुंबीयांनी या मुलांची ओळख पटविली. त्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एकुलता एक रोहन हा बेळगाव येथील बेननस्मिथ शाळेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आहेत. तसेच अंश हा सरदार हायस्कूलचा विद्यार्थी होत. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे. दोघा मित्रांचा एका दिवशी अचानक मृत्यू झाल्याने गणेशपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

Related posts: