|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव

पालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव 

पुणे / प्रतिनिधी :

: जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठवला

विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांवर राज्यभरात कारवाई सुरू असून, पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे.

यामध्ये भाजपच्या किरण जठार, आरती कोंढरे, फरजाना शेख, कविता वैरागे, वर्षा साठे या पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळा धनकवडे, रूखसाना इनामदार या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या या नगरसेवकांचे पद आता धोक्यात आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, महापालिका आयुक्तांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांबद्दल अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. आयुक्तांनी सर्व प्रकरणांची पडताळणी करून पद रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे पद रद्द होण्याची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. पुणे महापालिकेत भाजपने मोठय़ बहुमताने सत्ता मिळवली होती. त्यामुळे याचा सत्ता समीकरणांवर परिणाम होणार नाही. पद रद्द झालेल्या सदस्यांच्या जागेवर पोटनिवडणुका हाच पर्याय आहे. पोटनिवडणूक झाल्यास ती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची  ठरण्याची शक्यता आहे.