|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महिलांचा डिजिटल स्टार्टअप

महिलांचा डिजिटल स्टार्टअप 

अवघं विश्व डिजिटल युगात पोहोचलं, त्याला जवळपास दोन दशकं झाली आहेत. युरोप-अमेरिकेतील सर्व व्यवहार केव्हापासूनच ऑनलाईन झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, करियर मार्गदर्शन, वैज्ञानिक व तांत्रिक सल्ला ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध असतो. डिजिटल क्रांती झाली असल्यामुळे तुम्ही कुठून काम करता, यापेक्षा ते किती वेगाने करता की नाही, याला महत्त्व आहे. तंत्रज्ञान व इंटरनेट यामुळे भारतातील अनेक उद्योजक आपापले व्यवसाय संगणक व मोबाईलच्या मदतीने करत आहेत. अनेक महिलांनीही ई मेल साईट्स सुरू केल्या आहेत व ब्लॉग्जदेखील. सुचिता सलवान ही दिल्ली विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवीधर आहे. तिने ‘लिट्ल ब्लॅक बुक’ (एलबीबी) हा डिजिटल मंच सुरू केला आहे. इव्हेंट्स, पर्यटन, ऍडव्हेंचर, हॉटेल्स, लाईफस्टाईल आणि शॉपिंग वगैरे अनेक गोष्टींची माहिती एलबीबीवर मिळू शकते. अर्थात ही माहिती दिल्लीबद्दलची आहे. दिल्लीचा शोध घेत असताना, सुचिताला त्यात अनेक कुतूहलजनक गोष्टी आढळल्या. यातून व्यवसाय होऊ शकतो, हे तिच्या कुशल नजरेने हेरलं.

फाल्गुनी नायर ही आयआयएम अहमदाबाद या नामवंत संस्थेची पदवीधर आहे. कोटक महिंद्रच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा देऊन, तिने ‘नायिका (Nykaa) डॉट कॉम’चा शुभारंभ मुंबईत केला. ब्युटी आणि वेलनेस बाजारपेठेतील विविध उत्पादनाची घरबसल्या माहिती करून देण्याचा हा व्यवसाय. कोणत्याही  व्यक्तीला तिच्या सौंदर्य व आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन, तिने कोणते प्रॉडक्ट्स विकत घ्यावेत याचं मार्गदर्शन नायिकातर्फे केलं जातं. मालिनी अगरवाल यांचं नाव तर खूपच गाजत आहे. ‘मिस मालिनी पब्लिशिंग’ हा मनोरंजनप्रधान डिजिटल मंच त्यांनी सुरू केला आहे. त्यात मिस मालिनी डॉट कॉम, मिस मालिनी व्हिडिओज हे यूटय़ूब चॅनेल आणि सोशल मीडिया नेटवर्कचा समावेश होतो. त्याचे तब्बल वीस लाख फॉलोअर्स आहेत. आपल्याकडच्या लोकांना बॉलिवूड, फॅशन व लाईफस्टाईल याविषयीच्या बातम्यांमध्ये रस आहे, हे लक्षात घेऊन मालिनी यांनी प्रथम ब्लॉग सुरू केला. जेव्हा भारतात सोशल मीडियाचा जन्म झाला, तेव्हापासूनच मालिनी यांनी एका नव्या नजरेने ग्लॅमर जगताचा वेध घेण्यास सुरुवात केली. कुठलाही व्यवसाय वा कला असो, तुम्ही नव्या पद्धतीने व्यक्त झालात, तरच लोक त्याची दखल घेत असतात.

भारतात स्थानिक विणकर व कारागिरांना आपली उत्पादनं जगाच्या बाजारात विकता यावीत, याचा विचार करून, साक्षी तलवार यांनी ऑनलाईन व्हेंचर सुरू केलं. हाती विणलेले गालिचे, घोंगडय़ा, आणि गृहसजावटीच्या वस्तू यांची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध करून ऑर्डर्स मिळवून त्या पूर्ण करण्याचा हा व्यवसाय आहे. यामध्ये कुठेही दलालांचा संबंध येत नाही. त्यामुळे कारागिरांनाही उत्तम पैसे मिळतात. साक्षीच्या या व्हेंचरचं नाव आहे, ‘रग्ज अँड बियाँड’.

भारतात मानसिक रुग्णांची संख्या तशी मोठी आहे. दीपिका पडुकोणसारखी नटीसुद्धा मानसिक आजारातून गेली आहे आणि त्याबद्दल तिने आपलं मनोगतही व्यक्त केलं आहे. मात्र अनेकांना आपल्या आजाराबद्दल कुठे वाच्यता करण्याचीही लाज वाटते. रिचा सिंग यांनी ‘युवर दोस्त’ हा भावनिक आरोग्यासाठीचा एक डिजिटल मंच चालू केला आहे. त्यावरून मनोरुग्णांना तज्ञांचं मार्गदर्शन मिळू शकतं. ‘शॉपक्ल्यूज’च्या मुख्याधिकारी व सहसंस्थापक राधिका अगरवाल आहेत. देशातील पहिल्या तीन ऑनलाईन बाजारमंचांमध्ये याचा समावेश होतो. टियर टू व टियर थ्री शहरांमधील ग्राहक व विपेत्यांना एकाच बाजारपेठात आणण्याचं काम या मंचातर्फे केलं जातं.  प्रांशु भंडारी या महिलेच्या डोक्मयात ‘कल्चरली’ची कल्पना आली. वेबच्या माध्यमातून वेगवेगळय़ा भाषा शिकवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. आजवर लाखो लोकांनी त्या आधारे शिक्षण घेतलं आहे. सायरी चहल या ‘शीरोझ’च्या संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. महिलांना विविधांगी पाठबळ पुरवणं, मार्गदर्शन करणं आणि संधी मिळवून देणं हे काम त्यातर्फे केलं जातं. वन-टू-वन पद्धतीने हेल्पलाईन देण्याचं कामही केलं जातं.  मुंबईत मिन्नत लालपुरिया या तरुण महिलेने खूपच कल्पकता दाखवली आहे. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनियंरिंगमधून त्या आयटी इंजिनियर झाल्या आहेत. त्यांनी ‘सेव्हन वचन’ नावाची ऑनलाईन वेडिंग सल्ला सेवा सुरू केली आहे याला आपण मराठीत सप्तपदी असे म्हणू शकतो. ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट ज्यांनी बघितला आहे, त्यांना वेडिंग प्लॅनर म्हणजे काय, ते माहीत असेलच. विवाह समारंभातील वधूवरांचा पोशाख, दागदागिने, खाद्यपदार्थांचा मेन्यू, म्युझिक, सजावट या सर्व गोष्टी यामध्ये येतात. विवाह सोहळय़ाच्या गरजा लक्षात घेऊन, अवघ्या तीन दिवसांत योग्य प्रोफेशनल्सच्या मदतीने सर्व नियोजन करण्याचं काम ‘सेव्हन वचन’तर्फे केलं जातं. देशात गुरुग्राम, म्हणजेच गुडगाव ही उद्योगनगरी म्हणून खूपच विकसित झाली आहे. मुंबईच्या फॅशन दुनियेतील अनेक मॉडेल्स हे मुळात या शहरातले वा हरियाणातले असतात. गुरुग्राममध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे शिवानी पोतद्दार आणि तन्वी मलिक या दोन तरुणींना ‘फॅब ली डॉट कॉम’ ही कंपनी सुरू करावीशी वाटली, यात आश्चर्य नाही. या वेबसाईटच्या माध्यमातून स्कर्ट्स, पँट्स, शॉर्ट्स, टाइट्स, लेगिन्स, टॉप्स व डेसेस यासारखे कपडे विकले जातात. त्यांच्या वेबसाईटचं नाव आहे ‘वॉव’. या वेबसाईटला दररोज 12 ते 15 हजार लोक व्हिजिट करतात आणि एक लाखापेक्षा अधिक तिचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे सर्व कपडय़ांचं डिझाईन व उत्पादन करण्याचं कामही ही कंपनी करते.

कोणत्याही देशाचा विकास नुसता त्याचा जीडीपीचा दर कसा वाढतो आहे, यावरून ठरवणं योग्य वाटत नाही. त्या देशाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास कसा होत आहे, लोकांना संधी उपलब्ध होत आहेत का आणि त्याचा फायदा घेतला जात आहे का, या बाबीही महत्त्वाच्या असतात. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय अनेक स्त्रिया आपापल्या क्षेत्रात तळपत आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बँक, महिलांकरिता स्वतंत्र औद्योगिक वसाहती अशा दिखाऊ घोषणांपेक्षा अधिकाधिक स्त्रिया उद्योग व्यवसायात कशा उतरतील, यासाठी सरकारी व निमसरकारी संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत. जीवनाच्या विविध क्षेत्रांना व गरजांना हेरून, त्यांना कवेत घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. वेगवेगळय़ा वाटांनी जाऊन त्या आपलं कर्तृत्व सिद्ध करतच राहणार आहेत. विविध क्षेत्रांमध्ये आपले पंख पसरून, सर्व शक्तीनिशी झेप घेणारच आहेत.

नंदिनी आत्मसिद्ध