|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गणेशोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज 

कोकणातील गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पोलीस व जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठीही पोलीस यंत्रणांनी पूर्व नियोजन केले आहे. फक्त महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे यावर्षी चाकरमान्यांना खड्डय़ातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार आहे.

कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता लागली असून या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि संपूर्ण गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ाचे पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने खड्डय़ांचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱयांना सुखाचा प्रवास व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्रे सुरू करून 108 च्या रुग्णवाहिकाही तैनात ठेवल्या आहेत. वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे व एसटी बसस्थानकांवर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे आणि ठिकठिकाणी मार्ग बदललेले असल्याने वाहनचालकांसाठी महामार्गावरील प्रवास जोखमीचा ठरणार आहे. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्व सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी दोन्ही जिल्हय़ात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हय़ाबाहेरूनही पोलीस मागविण्यात आले आहेत.

कोकणात गणेशोत्सव हा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई-पुणे आणि परगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी येतात. एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो. आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात. गणपती दीड दिवसापासून 11 दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी व त्यानंतरही ठेवले जातात. हा सण सुरक्षित व शांततेत व्हावा, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन जबाबदारी पार पाडत असून वाढती वाहतूक सुरक्षित राहवी, यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेनेही यावर्षी मोठय़ा प्रमाणात खास गाडय़ा  सोडल्या आहेत.

सिंधुदुर्गात 68 हजार घरगुती गणपती

सिंधुदुर्ग जिल्हय़ात 68,291 घरगुती तर 35 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. या गणेशोत्सवासाठी येणाऱया गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने जोरदार पूर्व तयारी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गाची दुर्दशा झाली आहे. सर्वत्र खड्डेच-खड्डे असून वाहन चालकांना वाट काढतच प्रवास करावा लागत आहे. हे खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणचा दौरा केला आणि महामार्ग चौपदरीकरण कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु, बहुतेक ठिकाणी खड्डय़ांची तात्पुरतीच मलमपट्टी करण्यात आली आहे. सिमेंटने खड्डे भरले जात असल्याने पाऊस पडताच चिखल आणि पाऊस गेल्यावर धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी मदत केंद्रे सुरू केली असून सिंधुदुर्गात दहा ठिकाणी पोलीस मदत केंदे सुरू केली आहेत. अपघात झाल्यास वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी क्रेनचीही व्यवस्था केली आहे. अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी महामार्गावर खास पाच 108 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महामार्गावर 181 वाहतूक नियंत्रक पोलीस दिवस व रात्रपाळीसाठी तैनात केले आहेत. करुळघाट, फोंडाघाट, आंबोली घाट या घाट मार्गावर पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जनावेळी मिरवणुका काढल्या जातात तसेच गणेशोत्सव कालावधीत भजने व अन्य कार्यक्रम साजरे होतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण गणेशोत्सव कालावधीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हय़ात 500 पोलीस अधिकारी व कर्मचारी, 250 होमगार्ड आणि जिल्हय़ाबाहेरून एसआरपीच्या दोन तुकडय़ा मागविण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हय़ात दीड लाख घरगुती गणपती

रत्नागिरी जिल्हय़ातही गणेशभक्तांची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी रत्नागिरी जिल्हय़ात 1 लाख 65 हजार 357 ठिकाणी घरगुती आणि 110 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी संपूर्ण जिल्हय़ात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाकरमान्यांचा प्रवास निर्धोक व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी जिल्हय़ात 19 तपासणी नाके, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका, क्रेनसह मोठी यंत्रणा तैनात केली आहे. महामार्गावर वर्दळ वाढणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 19 डेंजर स्पॉट निश्चित करून त्याठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी 24 तास पोलीस पथक कार्यरत राहणार आहे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चोख नियोजन केले असून गणेशोत्सव काळात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. विसर्जन सोहळ्य़ासाठी 100 लाईफ जॅकेटही तयार ठेवली आहेत. रत्नागिरी जिल्हय़ासह सिंधुदुर्गातील करुळ घाट, फोंडाघाट, आंबोली घाट या घाटमार्गावरही वाहतुकीची वर्दळ वाढण्याची शक्यता असल्याने सर्व घाटमार्गांवर वाहतूक नियंत्रक पोलीस दिवसरात्र तैनात असणार आहेत. कोकणातील गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पोलीस व जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठीही पोलीस यंत्रणांनी पूर्व नियोजन केले आहे. फक्त महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे यावर्षी चाकरमान्यांना खड्डय़ातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार आहे.

संदीप गावडे