|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कथा दु:ख हरी कथा मुक्त करी

कथा दु:ख हरी कथा मुक्त करी 

हनुमंतराय रामप्रभूला सांगतात-जर तुमचे ध्यान आणि नाम सुटले तर प्राण निघूनही जातील. परंतु सीतामाईंचे आपल्यावर इतके प्रेम आहे की आपले ध्यान आणि नाम सुटू शकत नाही; आणि नाम आणि ध्यान बाजूला झाल्याशिवाय प्राण जाऊ शकत नाही. जानकीचे मन, वचन आणि कर्म तिन्ही आपल्याशी संबद्ध आहेत म्हणून त्यांचा प्राण जाऊ शकला नाही. कृष्णाचे कथामृत विरहावस्थेत देखील प्राण रोखून ठेवते. भगवंताची कथा मोक्षदा आहे, अमृत आहे, तप्तांचे जीवन आहे. संसारतापापासून पीडितांच्या पीडेचे निवारण करते. ज्ञानीदेखील कथामृताची स्तुति करतात. कथा पाप दूर करणारी आहे. ती वीर्यधर्म सूचक आहे. श्रवणासाठी कल्याणकारी आहे. कथामृतांत भगवंताचे सहा गुण-यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य प्रकट झाले आहेत. तुकाराम महाराजही कथेचा महिमा गाताना म्हणतात- कथा दु:ख हरी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ।। कथा पाप नासी उद्धरिले दोषी। समाधि कथेसी मूढजना ।। कथा तप ध्यान कथा अनु÷ान। अमृत हे पान हरीकथा ।। कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप कळीकाळासी ।। तुका म्हणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ।। आणखी एका अभंगात तुकाराम महाराज कथेचे सुख ब्रह्मदेवालाही वर्णन करता येत नाही असे म्हणतात. तो अभंग असा- कथा त्रिवेणीसंगम देव भक्ती आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ।। जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर। गाती ऐकती सादर जे पवित्र हरीकथा।। तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया। पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां ।। अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रह्मा नेणे वर्णुया सुखा ।। वस्त्रदानापेक्षा अन्नदान श्रे÷ आहे, परंतु कथादान सर्वश्रे÷ आहे. निरपेक्षतेने कथा करणाराच खरा भक्त आहे. ज्ञानदानाने जीवन सुधारते. कथादानाने जीवाला नेहमीकरता शांति मिळते. गोपी म्हणतात-कन्हैया! तुझ्यासाठी तर आम्ही सर्वस्वाचा त्याग केला आहे. नाथा! तुझ्यासाठीच आम्ही लोकलाज सुद्धा सोडून दिली आहे म्हणून आम्हाला लवकरच दर्शन देण्याची कृपा कर. (गोपींची कृष्णदर्शनाची लालसा कशी आहे पहा. डोळय़ाला पापण्या देणाऱया ब्रह्मदेवावरसुद्धा गोपी रागावत आहेत, कारण ह्या पापण्या हालत राहिल्यामुळे दर्शनात बाधा येते.) गोपी म्हणतात-पापण्या मिटल्याने एक क्षणभर आम्ही आपल्या दर्शनापासून वंचित होतो. एका क्षणाचा विरहसुद्धा आम्हाला असह्य आहे. डोळय़ांना पापण्या बनविणारा ब्रह्मदेव जड आहे. जर त्याने पापण्या केल्याच नसत्या तर आम्ही आपले दर्शन निरंतर घेऊ शकलो असतो. नाथ! तुमच्या दर्शनासाठी वाट पाहतच ठेवणार का आम्हाला? कन्हैया! तुला शोधता शोधता आमचे डोळेसुद्धा थकून गेले, हरले. जेव्हापासून तू गेला आहेस तेव्हापासून आम्हाला शांती नाही. दु:खहर्ता, सुखकर्ता असा तू आम्हाला केव्हा भेटशील?

Ad.  देवदत्त परुळेकर