|Sunday, April 21, 2019

बंद 

एकेका शब्दाची निश्चित अशी छटा असते. धरबंद हा शब्द उच्चारला की वागण्याला धरबंद नसलेला आणि बेफिकीरपणे वागणारा माणूस डोळय़ांसमोर येतो. पायबंद म्हटल्यावर वाईट गोष्टींना घातलेला आळा दृग्गोचर होतो. गोळीबंद म्हटलं की आटोपशीर आकाराची जेवढय़ास तेवढी काटेकोर रचना आठवते. बाजूबंद म्हटल्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज आणि दंडावर वाकी परिधान केलेली प्रमदा स्मरून अंगावर गोड काटा येऊ शकतो.

बंद या शब्दाचं तसं नाही. ‘काम चालू रस्ता बंद’ ही पाटी आठवून पहा. ऐन घाईच्या वेळेला आपण ज्या रस्त्याने जाणार असू तोच रस्ता नेमका उकरून ठेवलेला असतो. प्रिय व्यक्तीच्या अंगरख्याचा बंद वेगळा. निकडीच्या प्रवासात असताना आपली गाडी बंद पडून होणारा खोळंबा वेदनादायक असतो. खवय्या लोकांच्या जीवनात चतुर्मासात (किंवा किमान श्रावणात) जिभेला सुखावणाऱया अनेक गोष्टी बंद असतात. महिनाअखेर, वाहतूक पोलीस आणि गरीब बिचारा वाहनचालक यांचे ‘प्रवेश बंद’ पाटीशी अतूट नाते असते. महिनाअखेरीस वाहनचालकाला ती पाटी दिसत नाही, मात्र वाहतूक पोलिसाला प्रवेश बंद असलेल्या रस्त्यावरून जाणारा वाहनचालक नेमका दिसतो आणि तो पकडला जातो. लग्नसमारंभात पाहुण्यांनी दिलेल्या अहेराच्या बंद पाकिटात किती रक्कम असेल याचे कोडे यजमानाला अस्वस्थ करीत असते, पण ते बंद पाकीट चारचौघात उघडणे शक्मय नसते. रविवारी सगळे दवाखाने आणि औषधांची दुकाने बंद असतात ही गोष्ट आपल्याला ठाऊक असली तरी रोगजंतूंना ठाऊक नसल्याने आपण नेमके त्याच दिवशी आजारी पडतो. महान व्यक्तींचे स्मरणदिन, राष्ट्रीय सण वगैरे दिवशी सरकार ड्राय डे घोषित करून विशिष्ट दुकाने बंद ठेवते. मात्र ‘ग्राहक देवो भव’ या ब्रीदाला जागून सदरहू दुकानांचे मालक दुकाने बंद ठेवून देखील ग्राहकांना छुप्या मार्गाने अहर्निश सेवा पुरवीत असतात.

राजकीय बंद निवडणुकीच्या उंबरठय़ावर अवतीर्ण होतो. कधी कधी विरोधी पक्ष हा बंद पुकारतात. कधी कधी सत्ताधारी आघाडीतले मित्रपक्ष स्वतःचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी लुटुपुटीचा बंद पुकारतात. बंद कोणाचाही असो, त्या दिवशी एसटीचे नुकसान होते, लहान मुले मोकळय़ा रस्त्यावर मनमुराद खेळतात आणि छोटेमोठे नेते टीव्हीवर-पेपरात चमकतात. बंदच्या बातम्यांमध्ये ‘यशस्वी’, ‘संमिश्र/किरकोळ प्रतिसाद’, ‘गालबोट’, ‘शांततेत पार’ वगैरे ठेवणीतले मथळे असतात.

Related posts: