|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार

गणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार 

महामार्गावर वाकेड-लांजा येथे आराम बस-इको गाडीचा भीषण अपघात

5 गंभीर जखमी,

राजापूर- कोंडय़ेतील 4 कुटुंबावर अरिष्ट

दोन चिमुरडय़ांसह माता दगावली

जुळे भाऊ गंभीर जखमी

वार्ताहर /लांजा/राजापूर

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे झालेल्या भिषण अपघाताने कोकणातील गणेशोत्सवाच्या उत्साहावर दुःखाचे सावट निर्माण केले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी येणाऱया चाकरमान्यांच्या गाडीला लांजा तालुक्यातील कुवे येथे झालेल्या भीषण अपघातात राजापूर तालुक्यातील कोंडय़े येथील 4 कुटुंबातील सातजण जणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेने कोंडय़े गावच नव्हे तर संपूर्ण राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

या अपघातामध्ये प्रियांका काशिनाथ उपळकर (21), मंगेश काशिराम उपळकर (26), पंकज हेमंत घाणेकर (19), मानसी हणुमंत माजळकर (30), भार्गवी हणुमंत माजळकर (6 महिने), सार्थक हणुमंत माजळकर (6), राजेश बापू शिवगण (26) असे 7 जण मृत्युमूखी पडले आहेत.

अपघातामध्ये लव काशीराम उपळकर (18), अंकुश काशीराम उपळकर (18) हनुमंत शंकर माजळकर (35) हे सर्वजण कोंडय़े, ता. राजापूर, किरण तरळ (18,दोनिवडे, त़ा राजापुर) या प्रवाशांसह आरामबस चालक नितिन शांताराम जाधव (34,आडवली बौद्धवाडी, त़ा महाड) असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत़ क्लिनर संदेश शंकर कांबळे (21 ऱाखावडी, लांजा) किरकोळ जखमी झाला. मंगेश काशिराम उपळकर याला कोल्हापूर येथे उपचारासाठी नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बसचालक नितीन जाधव याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापुर येथे हलविण्यात आले आह़े संदेश कांबळे याला उपचार करुन सोडुन देण्यात आल़े

हा अपघात मंगळवारी सकाळी 10़ 30 वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गवरील कुवे कासार घाटातील वळणावर घडला. मुंबईहुन राजापुरच्या दिशेने चाललेल्या इको- व्हर्सा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरुन येणाऱया खासगी आराम बसवर जाऊन धडकल़ी सुलोचना ट्रव्हल्सची आरामबस (एम एच 04,एफ के-5508) पाचलहून मुंबईला चालली होती. कार आरामबसच्या चालकाच्या बाजुला धडकल़ी ही धडक एवढी जबरदस्त होती की कारचा जागीच चक्काचुर झाला. कारमधील 11 प्रवासी कारमध्येच तर बसचालक नितिन जाधव केबिनमध्ये अडकुन पडल़ा आरामबसचा क्लिनर संदेश कांबळे जोरदार आदळला मात्र धक्कयातून सावरल्यानंतर त्यानेच या अपघाताची माहिती लांजा पोलिसांना दिल़ी

गणेशोत्सवासाठी गावाकडे येत होते चाकरमानी

हे सर्वजण मुळचे राजापूर तालुक्यातील कोंडय़े गावातील खालची शिवगणवाडी, मधलीवाडी येथील रहिवासी आहेत. सध्या हे दहीसर, रावळपाडा या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुरूवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार असल्याचे एकाच गावातील हे सर्वजण गणेशोत्सवासाठी कारने एकत्र गावी येत होते. मात्र गावी पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातामध्ये हणुमंत माजळकर यांच्या पत्नीसह दोन चिमुडय़ांनाही काळाने हिरावून नेले आहे. उपळकर कुटुंबातील प्रियांका आणि मंगेश यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी लव आणि अंकूश हे जुळे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.

शिवगण कुटुंबीयांचा आधारच हरपला

या अपघातामध्ये पंकज हेमंत घाणेकर हा आई-वडीलांचा एकूलता एक मुलगाही काळाने हिरावून नेला आहे. पंकज आई-वडीलांसोबत मुंबईला राहत असे. त्याचे आई व वडील एक दिवसापूर्वीच मुंबईहून गावी आले होते. मात्र कारने येण्याचे नियोजन केल्याने पंकज मागे थांबला तो परत कधीही न येण्यासाठी. राजेश बापू शिवगण हे देखील काही वर्षापूर्वीच नोकरीसाठी मुंबईला गेले होते. त्यांचे आई, वडील, भाऊ सर्व गावीच असतात. मुंबईला नोकरी करून गावाच्या कुटुंबीयांना हातभार लावायचा असे स्वप्न उराशी बाळगून गेलेला राजेश आता कायमचाच निघून गेल्याने शिवगण कुटुंबीयांचा आधारच हरपला आहे.

दोन बालकांचा मृत्यु चटका लावणारा

या अपघातात सहा महिन्यांची चिमुकली भार्गवी व सहा वर्षींचा सार्थक या दोघांचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात गाडीत अडकलेल्या या लहानग्यांना बाहेर काढताना मदतकार्य करणाऱयांसह उपस्थित साऱयांचेच हृदय पिळवटून गेले होत़े त्या दोन बाळांचा मृत्यु सर्वांनाच चटका लाऊन गेला.

प्रशासकीय यंत्रणा दाखल

अपघाताची माहिती मिळताचा लांजा पोलिस निरीक्षक विकास गावडे, राजापुर पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, लांजा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक पंडीत पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिरगावर शांताराम पंदेरे, बलवंत शिंदे, संदेश जंधव, राजेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजा येथील युवकांच्या मदतीने कारमध्य अडकलेले मृतदेह व प्रवाशांना बाहेर काढुन लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल़े लांजातील शासकीय व खासगी वैद्यकीय अधिकाऱयांनीही घटनास्थळी मदतकार्य केल़े अपघाताची माहिती मिळताच कोंडय़ेतील ग्रामस्थांसह राजापूरातील अनेकांनी लांजा येथे धाव घेतली.

स्थानिक युवकांचे मदतकार्य

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक ड़ॉ प्रविण मुंडे, लांजा तहसिलदार वनिता पाटील, आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली व अपघातग्रसतांची विचारपूस केली. लांजा येथील राजु हळदणकर, योगेश सुर्वे, राजु जाधव, नंदराज कुरुप, स्वरुप गुरव, अभिजित राजेशिर्के, समिर तानावडे, रंजित सार्दळ, संदिप सावंत, निलेश डांगे, राहुल शिंदे, धनंजय गांधी या युवकांनी मदतकार्यामध्ये विशेष पुढाकार घेतला होता.

मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर घडलेल्या या अपघाताने या मार्गावरील वाहतुक सुमारे दोन तास रोखली गेली होत़ी त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱया चाकरमान्यांच्य गाडय़ांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्य़ा एक तासानंतर एकेरी वाहतुक संथ गतीने सुरु करण्यात आली. अपघातग्रस्त वाहने जेसेबीच्या सहाय्याने बाजुला केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाल़ी