|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » क्लासचा ‘कस’

क्लासचा ‘कस’ 

इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका गमावल्याने टीम इंडियातील अनेक कच्चे दुवे समोर आले आहेत. आगामी विश्वचषक आंग्लभूमीतच रंगणार असल्याने हा पराभव गांभीर्याने घेणे गरजेचे असून, याबाबत संघाला सखोल आत्मपरीक्षण करावे लागेल. इंग्लंडच्या दौऱयात भारतीय क्रिकेटपटूंकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता कुणालाही आपला दर्जा सिद्ध करता आला नाही. कसोटी हा क्रिकेटमधील सर्वांत वरच्या प्रतीचा प्रकार मानला जातो. त्यात इंग्लंड वा ऑस्ट्रेलियासारख्या खेळपट्टय़ा असतील, तर तेथे अक्षरश: खेळाडूंचा कस लागतो. या खेळपट्टय़ा प्रामुख्याने स्विंग गोलंदाजांना साथ देणाऱया असल्याने तेथे संयमाबरोबर आपल्यातील क्लासचेही दर्शन घडवावे लागते. त्यामुळे एरवी ट्वेंटी-20 सारख्या स्पर्धांमध्ये उन्मुक्तपणे फटकेबाजी करणारे फलंदाज अशा ठिकाणी मात्र उघडे पडतात. इंग्लंडमधील एकूणच प्रदर्शन पाहता भारतीय फलंदाजांबाबत असेच म्हणता येईल. यात सर्वाधिक अपयश उठून दिसते, ते भारतीय सलामीवीरांचे. मुरली विजय, शिखर धवन व लोकेश राहुल हे तिघे आघाडीचे फलंदाज मानले जातात. मात्र, त्यांची इंग्लंडमधील कामगिरी ही त्यांच्या एकूण क्रिकेट दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारी म्हटली पाहिजे. विजयची भारतीय खेळपट्टय़ांवरील कामगिरी वरचढ असेलही. मात्र, त्याच्यासारखा फलंदाज इंग्लंडमध्ये केवळ हजेरी लावण्यापुरता सीमित राहिला असेल, तर नक्कीच त्यालाही आपल्या खेळाबद्दल विचार करणे भाग आहे. धवन हा फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, त्याच्याही धावा या दौऱयात आटलेल्या दिसल्या. राहुलने अखेरच्या कसोटीत शतक झळकावले असले, तरी त्यालाही अपेक्षित चमक वा सातत्य दाखविता आले नाही. अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज मानला जातो. त्याची राहुल द्रविडशीही तुलना केली जाते. रहाणेच्या तंत्राबद्दल तसे शंका घेण्याचे कारण नाही. द्रविडच्या तोडीचा क्लास, पदलालित्य नसले, तरी त्या मार्गाने जाण्याइतका दर्जा त्याच्याकडे नक्कीच आहे. किंबहुना, आत्मविश्वास व संयम यामध्ये रहाणे कमी पडतो. तसे पाहिल्यास या कसोटा मालिकेत विराट खालोखाल त्याचीच कामगिरी नजरेत भरते. नॉटिंगहममधील त्याची विराटसोबतची खेळीही निर्णायकच. परंतु, तरीदेखील स्वत:मधील दर्जाला न्याय देण्यास तो अपयशी ठरतो आहे. भविष्यात आपल्या खेळाला त्याला चिकाटी व सातत्याची जोड द्यावी लागेल. चेतेश्वर पुजारा हा चिवट फलंदाजीकरिता ओळखला जातो. एक शतक व अर्धशतक ही त्याची कामगिरी त्यातल्या त्यातल्या त्यात बरी वाटत असली, तरी ती तशी निराशाजनकच. एरवी खेळपट्टीवर तास न् तास उभ्या राहणाऱया या फलंदाजाला गरज असताना मात्र ही भूमिका निभावता आली नाही. हार्दिक पंडय़ाची गणती अष्टपैलूंमध्ये होते. कपिलदेवशी मध्यंतरी त्याची तुलना झाली होती. मात्र, ती घाईची ठरते. ट्वेंटी-20 वा एखाद दुसऱया वनडेत हाणामारी करणारा फलंदाज इतपतच बहुदा त्याची झेप असावी. कार्तिकच्या जागी खेळवलेला ऋषभ पंत वास्तविक वन डेच्या जातकुळीतला. तरी तो कार्तिकच्या तुलनेत उजवा ठरला, असे म्हणता येईल. हनुमा विहारी याने पहिल्या वहिल्याच सामन्यात अर्धशतक फटकावत फलंदाजी तसेच गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसते. तरीदेखील विराटसारखा क्लास कुणालाच दाखविता आला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. या दौऱयात विराटने दोन शतके व अर्धशतकांसह धावांचा रतिब घातला. याद्वारे कोणत्याही खेळपट्टी वा गोलंदाजीवर आपण खेळू शकतो, हेदेखील त्याने दाखवून दिले आहे. अचूक टायमिंग, कमालीचे पदलालित्य, चौफेर चेंडू तडकावण्याची क्षमता, सातत्य, आत्मविश्वास व आक्रमकता ही त्याच्या खेळाची वैशिष्टय़े आहेत. आजचा जमाना 20 षटकांच्या क्रिकेटचा असला, तरी कोहलीने आपला क्लास सोडलेला नाही. उलट त्याचा आलेख वाढतोच आहे. त्यामुळेच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो यशस्वी होताना पहायला मिळतो. एकेकाळी भारतीय संघात मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण असे शैलीदार फलंदाज हेते. मुख्य म्हणजे हे सर्व एकत्र खेळले आहेत. आज कोहली वगळता कुणाकडे तशी तंत्रशुद्धता दिसत नाही. ट्वेंटी-20 चा अतिरेक झाल्याने तंत्रापेक्षा आता जणू हाणामारीलाच महत्त्व आले आहे. त्यामुळे एकूणच खेळाडूंचा दृष्टीकोन बदलत चालला असून, प्रत्येक चेंडू सीमेपार तडकावण्याकडे कल वाढतो आहे. फलंदाज बऱयाचदा गॅप काढण्याऐवजी डोक्यावरूनच चेंडू फटकावण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच चांगल्या चेंडूचा आदर करण्याची वा तो संयमाने खेळून काढण्याची कसोटीची खास शैली हरवत आहे. फटकेबाजीचा हा ट्रेंड आता इतका पराकोटीला पोहोचला आहे, की शास्त्रशुद्धता, खेळातील नजाकतच इतिहासजमा होते की काय, अशी भीती वाटते. अर्थात हे सगळे अनर्थ झटपट क्रिकेट व त्यातून उभ्या राहिलेल्या अर्थकारणातून घडले आहेत, ही भारतासारख्या देशासाठी धोक्याचीच घंटा ठरते. संघ निवड हाही कळीचा मुद्दा.  पृथ्वी शॉला अखेरच्या कसोटीत खेळवायला हवे होते. आगामी विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. हे पाहता निवड समितीला क्लासला व यंगस्टर्सला महत्त्व द्यावेच लागेल. केवळ हिटर्सवर अवलंबून राहून चालणार नाही. भारतीय वेगवान व फिरकी गोलंदाजांची कामगिरी मात्र उत्कृष्टच म्हणायला हवी. इशांत, बुमराह, शमी, यादव, अश्विन, जडेजा, पंडय़ा, विहारी सगळेच कौतुकास पात्र. त्यांनी आपली क्षमता परदेशातही सिद्ध केल्याने त्यांच्याकडून भविष्यातही अपेक्षा असतील. तसा लॉर्ड्सचा सामना वगळता अन्य सामन्यांमध्ये भारताने जोरदार टक्कर दिली. विराट व गोलंदाजांच्या कामगिरीला फलंदाजांची थोडी साथ मिळाली असती, तर मालिका विजय नक्कीच साकारता आला असता. ऍलिस्टर कूकचा शतकी निरोप व अँडरसनने ग्लेन मॅकग्राथच्या विक्रमाशी केलेली बरोबरी यामुळेही हा दौरा स्मरणात राहील. फॉर्म इज टेंपररी, बट क्लास इज परमनंट, असे म्हणतात. इंग्लंडच्या दौऱयातून जणू हेच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे क्लासचा ‘कस’ लावल्याशिवाय पर्याय नाही.

Related posts: