|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » सूचीबाहय़ पब्लिक कंपन्यांचे समभाग केवळ डिमॅटमध्ये

सूचीबाहय़ पब्लिक कंपन्यांचे समभाग केवळ डिमॅटमध्ये 

2 ऑक्टोबरपासून नव्याने समभाग मिळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सूचीबाहय़ असणाऱया पब्लिक कंपन्यांना 2 ऑक्टोबरपासून नव्याने समभाग जारी करणे बंधनकारक होणार आहे. हे सर्व समभाग डिमॅट खात्यामध्ये जमा करावे लागतील असा आदेश सरकारकडून देण्यात आला. यानंतर समभागांचे हस्तांतरण हे केवळ डिमॅट अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होतील. कंपन्यांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी, उद्योग क्षेत्रात गुंतवणूकदारांचे सरंक्षण आणि प्रशासकीय वातावरण सुधारण्यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत, असे कंपनी व्यवहार मंत्रालयाने पत्रकात म्हटले.

पैशांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी मंत्रालयाकडून बनावट कंपन्यांचा शोध घेण्यात येत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी कायदा, 2013 नुसार भारतात पब्लिक आणि प्रायव्हेट कंपन्या आहेत. साधारणपणे 200 पेक्षा अधिक सदस्य असल्यास ती कंपनी पब्लिक समजण्यात येते आणि त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागते.

कागद स्वरुपात समभाग बाळगल्यास चोरी, हरविणे, घोटाळा आणि गैरवापर होण्याची शक्यता होती. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात पारदर्शकता येण्यास आणि बेनामी समभागधारक, फसवणूक यासारखे गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल. सूचीबाहय़ पब्लिक कंपन्यांना डिपॉझिटरी आणि समभाग हस्तांतर एजन्टच्या माध्यमातून समभागांचे डिजिटायझेशन करावे लागेल.