|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » व्यापार करारासाठी भारत इच्छुक

व्यापार करारासाठी भारत इच्छुक 

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा : भारतातून फोन आल्याची दिली माहिती, व्यापारयुद्धाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारत अमेरिकेसोबत व्यापार करार इच्छितो. आपल्या प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यावरही भारत व्यापार कराराबद्दल इच्छुक असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारत आणि चीन यासारख्या देशांना मिळणारे अनुदान संपुष्टात यावे असा आग्रह ट्रम्प यांनी धरला आहे.

अमेरिका देखील विकसनशील देश असून अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत आमच्या देशानेही गतिमान विकास करावा, असे इच्छित असल्याचे ट्रम्प यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या उत्पादनांवर 100 टक्के आयातशुल्क आकारल्याचा आरोप ट्रम्प यांनी भारतावर केला आहे.

अनुदानाबद्दल बोलल्याच्या दुसऱया दिवशी भारतातून फोन आला, ते पहिल्यांदाच व्यापार करार करू इच्छित आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले. परंतु त्यांनी यावेळी कोणी फोन केला होता हे मात्र स्पष्ट केलेले नाही. पूर्वीच्या प्रशासनासोबत भारताने याबद्दल कोणतीच चर्चा केली नाही, चालू असलेल्या स्थितीबद्दल ते आनंदी होते, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

भारत रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली खरेदी करणार आहे. याप्रकरणी अमेरिका भारतासोबत चर्चा सुरू ठेवणार असल्याचे अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने सांगितले. रशियाकडून होणाऱया शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर निर्बंध लादणारा कायदा अमेरिकेने संमत केल्याने भारताचा हा व्यवहार अडचणीत सापडला आहे. रशियाकडून भारताने शस्त्रास्त्र खरेदी केल्यास अमेरिका या व्यवहाराला कायद्याचे उल्लंघन मानू शकते.

किम यांचे ट्रम्प यांना पत्र : पुन्हा चर्चेची दर्शविली इच्छा

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले आहे. किम यांनी पत्राद्वारे ट्रम्प यांची पुन्हा भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासन देखील किम यांच्यासोबत चर्चेची शक्यता पडताळत असल्याची माहिती व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी दिली. दोन्ही नेत्यांची या अगोदर 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट झाली होती.

ट्रम्प आणि किम यांची दुसरी भेट कधी होईल हे स्पष्ट झाले नाही. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक बैठकीवेळी ही भेट होण्याची शक्यता आहे. तर किम महासभेच्या बैठकीला येणार नसल्याचे ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचे मानणे आहे.

अण्वस्त्रs नष्ट करण्याची इच्छा

किम यांचे पत्र उत्साहवर्धक आणि सकारात्मक आहे. किम अण्वस्त्रs समाप्त करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट होते. रविवारी उत्तर कोरियात झालेल्या संचलनात दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करण्यात आलेले नाही. उत्तर कोरियाचे हे पाऊल दोन्ही देशांमधील विश्वासवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सँडर्स म्हणाल्या.

Related posts: