|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सर्व बांगलादेशी घुसखोरांना हाकलू : शाह

सर्व बांगलादेशी घुसखोरांना हाकलू : शाह 

जयपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांना केले संबोधित : राजस्थानातील विजय 2019 साठी आवश्यक

वृत्तसंस्था/ जयपूर

बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावर भाजपचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करत पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकलणार असल्याची घोषणा केली आहे. जयपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या शक्ती केंद्र संमेलनाला संबोधित करताना त्यांनी ‘एक देखील बांगलादेशी घुसखोर भारतात राहू देणार नाही, वेचून वेचून त्यांना हाकलू’ असे विधान केले. तसेच भाजप अध्यक्षांनी यावेळी आसाम राष्ट्रीय नागिरकत्व नोंदणीचा (एनआरसी) उल्लेख करत त्याला विरोध करणाऱयांवर टीकेची झोड उठविली.

 मतपेढीची चिंता करणारे मानवाधिकाराबद्दल बोलू पाहत आहेत. परंतु त्यांना या देशाची आणि येथील गरीबांची चिंता नाही. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या नागरिकत्वाबद्दल सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक आणले आहे. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच बांगलादेशातून आलेल्या शिख, हिंदू, बौद्ध तसेच जैन शरणार्थींना नागरिकत्व देण्याची तरतूद असल्याचे शाह म्हणाले. सभेपूर्वी शाह यांनी जयपूरच्या मोतीडूंगरी गणेश मंदिरात जात दर्शन घेतले. शाह यांनी 4 बैठका घेत आगामी निवडणुकीबद्दल व्यूहरचना सुरू केली आहे.

चंगू-मंगू अशी हेटाळणी

काँग्रेसचे ‘हंप्टी-डंप्टी आणि चंगू-मंगू’ आम्हाला अहंकार झाल्याचे म्हणतात. परंतु त्यांना अहंकार आणि आत्मविश्वासात फरत असतो हेच माहित नसावे. आम्हाला अहंकार झाला नसून आत्मविश्वास आहे. आगामी निवडणूक ही कोणत्याही नेत्याची, कोणत्याही मुख्यमंत्र्याची, कोणत्याही मंत्र्याची आणि आमदाराची निवडणूक नाही. ती भाजपची निवडणूक आहे, तुम्ही भारतमातेला स्मरून मतदान करा, असे आवाहन शाह यांनी केले.

विजयासाठी झटा

राजस्थानात भाजप अंगदच्या पायाप्रमाणे असून त्याला कोणीच हलवू शकत नाही. 2019 चा विचार करून राजस्थानात भाजपला विजयी करावे. 2019 मध्ये आम्ही विजयी झालो तर 50 वर्षांपर्यंत केंद्राच्या सत्तेतून आम्हाला कोणीच हटवू शकत नाही. निवडणूक कार्यासाठी एकत्र होऊन काम करा आणि पक्षाला विजयी करण्यासाठी झटा, असे शाह यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.