|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारच्या लोकप्रतिनिधींवर सर्वाधिक गुन्हे दाखल

बिहारच्या लोकप्रतिनिधींवर सर्वाधिक गुन्हे दाखल 

नवी दिल्ली

 बिहारच्या खासदार आणि आमदारांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगाल दुसऱया तर केरळ तिसऱया स्थानावर आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीद्वारे याचा खुलासा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयांमध्ये अशाप्रकारची 1233 प्रकरणे हस्तांतरित करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींच्या विरोधातील प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी ही विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत यातील केवळ 136 प्रकरणांचा निकाल लागला असून 1097 प्रकरणी अद्यापही सुनावणी सुरूच आहे.

बिहारशी संबंधित 260 प्रकरणे विशेष न्यायालयांना सोपविण्यात आली असून यातील 11 प्रकरणांवर निर्णय देण्यात आला आहे. तर 249 प्रकरणी सुनावणी सुरू आहे. गुन्हेगारी प्रकरणे जलदपणे निकालात काढण्याप्रकरणी पश्चिम बंगाल फारच मंदगतीने हालचाली करत आहे. येथील खासदार आणि आमदारांच्या विरोधात 215 खटले सुरू असून आतापर्यंत एकही प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. केरळच्या 178 प्रकरणांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

केरळनंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. येथील 157 प्रकरणे न्यायदंडाधिकाऱयांसमोर विचाराधीन असून मागील 6 महिन्यांमध्ये यातील 44 प्रकरणांचा निकाल लागला आहे. दिल्लीतच 45 अन्य प्रकरणे सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत.

कर्नाटकात खासदार आणि आमदारांच्या विरोधात 142 गुन्हे नेंद आहेत. यातील 19 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये 64, महाराष्ट्रात 50 आणि मध्यप्रदेशात 28 खटले सुरू आहेत. खासदार आणि आमदारांच्या विरोधातील खटल्यांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिली आहे.