|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रशियाच्या युद्धाभ्यासास प्रारंभ, 3 लाख सैनिकांचा सहभाग

रशियाच्या युद्धाभ्यासास प्रारंभ, 3 लाख सैनिकांचा सहभाग 

वोस्तोक-2018 : चीन तसेच मंगोलियाचे सैन्य सहभागी, नाटो-युरोपीय देशांना दाखविणार सामर्थ्य, तणाव वाढणार

वृत्तसंस्था / मॉस्को

 रशियाने नाटो तसेच युरोपीय देशांना स्वतःचे सामर्थ्य दाखवून देण्यासाठी मंगळवारपासून आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरू केला आहे. शीतयुद्धोत्तर कालखंडातील हा सर्वात मोठा युद्धाभ्यास असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम सायबेरिया क्षेत्रात सुरू झालेल्या या सरावात चीन तसेच मंगोलियाचे सैन्य देखील सहभागी झाले आहे.

आठवडाभर चालणाऱया या युद्धाभ्यासाला ‘वोस्तोक-2018’ नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन रशियाच्या पश्चिम भागातील शहर व्लादिवोस्तक येथील आर्थिक फोरममध्ये सहभागी झाल्यानंतर या युद्धाभ्यासाला भेट देऊ शकतात. या आर्थिक फोरमच्या प्रमुख्य उपस्थितांमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा समावेश आहे.

स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ

रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव वाढत असताना हा युद्धाभ्यास आयोजित केला जातोय. रशियावर हस्तक्षेप केल्याचा आरोप करत युरोपीय देशांनी त्याच्यावर निर्बंध लादले आहेत. याचबरोबर युक्रेन आणि सीरियात सुरू असलेल्या संघर्षावरून देखील वाद निर्माण झाला आहे. वर्तमान आंतरराष्ट्रीय स्थितीत रशिया स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असल्याचे विधान क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी केले आहे.

नव्या शस्त्रयंत्रणांचा समावेश

रशियाचे सैन्य या युद्धाभ्यासात स्वतःच्या नव्या शस्त्रांचे सामर्थ्य दर्शविणार आहे. इस्कंदर क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्यभेदाचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून ही क्षेपणास्त्रs अण्वस्त्रs वाहून नेण्यास सक्षम आहेत. अत्याधुनिक टी-80 आणि टी-90 रणगाडय़ांसोबतच सुखोई-34 आणि सुखोई-35 लढाऊ विमान देखील स्वतःच्या क्षमतांचे प्रदर्शन करतील.

सोव्हिएत काळात युद्धाभ्यास

रशियाच्या सैन्याने या अगोदरचा सर्वात मोठा युद्धाभ्यास सोव्हिएत कालखंडात 1981 मध्ये केला होता. त्या युद्धाभ्यासात सुमारे 1.5 लाख सैनिकांनी भाग घेतला होता. तर सद्यकाळात या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून रशिया आणि चीन एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मोठय़ा संघर्षाची तयारी

नाटोने रशियाच्या युद्धाभ्यासावर टीका करत याला मोठय़ा संघर्षाची तयारी ठरविले आहे. आम्ही मागील काही काळापासून रशियाची आक्रमक भूमिका अनुभवत आहोत. रशिया स्वतःचा संरक्षण खर्च आणि सैन्य उपस्थिती वेगाने वाढवत असल्याचे नाटोचे प्रवक्ते डायलन ह्वाइट यांनी म्हटले. वोस्तोक 2018 नंतर नाटो ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाभ्यास करणार असून यात 30 देशांचे सुमारे 40 हजार सैनिक सहभागी होतील. तसेच नाटोच्या युद्धाभ्यासात 130 हून अधिक विमाने आणि 70 हून अधिक युद्धनौका सामील असतील.

Related posts: