|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तेलंगणातील अपघातात 55 प्रवासी ठार

तेलंगणातील अपघातात 55 प्रवासी ठार 

भाविकांनी भरलेली सरकारी बस कोसळली दरीत

हैदराबाद / वृत्तसंस्था

तेलंगणा सरकारची बस कोंडागट्टू घाटातील दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 55 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 5 प्रवासी जखमी असून त्यांच्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती राज्य शासनाने दिली. तीर्थयात्रा करून प्रवासी परतत असताना हा अपघात झाला.

ही बस जगतियाल जिल्हय़ाच्या बसआगाराची होती. त्यातून साधारणतः 60 प्रवासी प्रवास करत होते. ते सर्व कोडांगट्टू घाटमाथ्यावरील मंदिरात देवदर्शनासाठी आले होते. तेथून परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. या घाटातील वळणे अरूंद असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांना नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अपघाताच्या चौकशीचाही आदेश देण्यात आला आहे. अपघातग्रस्त बसच्या मागून जाणाऱया काही वाहनांमधील प्रवाशांनी अपघात झाल्यानंतर थांबून त्वरित बचाव कार्य सुरू केल्याने काही जणांचे प्राण वाचले. जगतियाल जिल्हाधिकारी ए. शरथ आणि जिल्हा पोलीस प्रमुख सिंधू शर्मा यांनी त्वरित हालचाली करून जखमींना रूग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली.

सर्व मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले असून तेथे उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.