|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आधारची वेबसाईट हॅक, मात्र संस्थेकडून इन्कार

आधारची वेबसाईट हॅक, मात्र संस्थेकडून इन्कार 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरही डल्ला 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘आधार’ची वेबसाईट हॅक झाल्याच्या वृत्तामुळे मंगळवारी दुपारपासून बरीच खळबळ उडाली आहे. मात्र आधारचे नियंत्रण करणाऱया युआयडीएआय या संस्थेने हे वृत्त फेटाळले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटलाही हॅकिंगचा फटका बसला आहे.

लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटच्या होमपेजवर डोरेमॉन आणि एक व्यंगचित्र दिसू लागल्याचे मंगळवारी अनेकांच्या लक्षात आले. तसेच या होमपेजवर आय ऍम स्टुपिड असा संदेश येऊ लागल्याने बराच गोंधळ उडाला. त्यानंतर सरकारच्या तांत्रिक विभागाने वेबसाईट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आधारचही वेबसाईट हॅक केल्याचेही वृत्त पसरले होते. वेबसाईटवरील माहिती चोरीला गेल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र युआयडीएआयने हे वृत्त साफ फेटाळले. वेबसाईटला कोणताही धोका निर्माण झाला नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व माहिती सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण या संस्थेने दिले. वेबसाईट हॅक झाल्याचा दावा हफिंग्टन पोस्टने केला होता.

सॉफ्टवेअरची निर्मिती ?

हफिंग्टन पोस्टच्या अहवालात आणखी खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग करून कोणीही आधार कार्ड तयार करू शकतो. या सॉफ्टवेअरची किंमत अवघी 2 हजार 500 रूपये आहे. आधार कार्ड हॅक करणाऱयांकडून या सॉफ्टवेअरची विक्री केली जात आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. तथापि या वृत्ताचाही इन्कार करण्यात आला असून असे कोणतेही सॉफ्टवेअर तयार केलेले नाही असे सांगण्यात आले आहे. तरीही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधार वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न कित्येकदा झाला आहे. हॅकर्सचा उद्देश माहिती चोरून आर्थिक लाभ मिळविण्याचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, युआयडीएआयच्या म्हणण्यानुसार आधार सॉफ्टवेअर हॅक केले जाण्याची शक्यता नाही. तज्ञांमध्येही यासंबंधी मतमतांतरे आहेत.