|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रघुराम राजन यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप !

रघुराम राजन यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय भूकंप ! 

काँगेसची कोंडी, प्रचंड राजकीय खळबळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लक्षावधी कोटी रूपयांच्या बँकांच्या थकबाकीला मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच जबाबदार आहे. त्यांच्या काळात कोणताही विचार न करता वारेमाप कर्जे वाटली गेली. त्यामुळे बँकांवर हालाखीची स्थिती ओढविली आहे. या बेछुट कर्जवाटपात बेजबाबदार बँक अधिकाऱयांचाही समावेश आहे, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दोन दिवसांपूर्वी केल्याने प्रचंड राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजन यांच्या गौप्यस्फोटाचे पडसाद बराच काळ उमटत राहण्याची शक्यता आहे.

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून त्याला पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार जबाबदार आहे, असा प्रचार काँगेस व इतर विरोधी पक्षांनी चालविला आहे. तथापि, सत्य काही वेगळेच आहे, हे रघुराम राजन यांच्या वक्तव्याने स्पष्ट होत आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात कोणताही विचार न करता जी प्रचंड कर्जें वाटण्यात आली त्यामुळे बँकांची समीकरणे बिघडून गेली आणि देशाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्याची झळ अजूनही बसत आहे. त्यामुळे देशाच्या या आर्थिक नुकसानाला मनमोहनसिंग सरकारची आर्थिक धोरणे प्रामुख्याने जबाबदार आहेत, हे राजन यांच्या विधानांमुळे उघड होत आहे, असे आर्थिक तज्ञांचे मत आहे.

मनमोहनसिंग सरकारच मुख्यतः जबाबदार

रघुराम राजन हेच मनमोहनसिंग यांच्या दुसऱया कार्यकाळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यामुळे त्यांना त्या काळातील सरकारची आर्थिक धोरणे आणि बँकांचे व्यवहार व या व्यवहारांमागील बोलविता धनी कोण होता याची पूर्ण माहिती होती. त्यांनीच आता ती उघड केल्याने काँगेसची मोठी कोंडी झाली आहे. संसदेच्या आर्थिक समितीला पाठविलेल्या पत्रात राजन यांनी ही माहिती उघड केल्याने तिला वजन प्राप्त झाले आहे.

सारवासारवीचा प्रयत्न

काँगेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँगेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या काळात 9 लाख कोटी कर्जांचा बोजा वाढला असा आरोप त्यांनी केला. तथापि, आरोपाच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा दिला नाही. तसेच बँकांवरील थकबाकीचा बोजा मनमोहनसिंग सरकारच्या काळात दिलेल्या कर्जांचाच परिणाम आहे, ही बाब त्यांनी सांगितली नाही, असा आरोप होत आहे.

भाजपच्या हाती कोलीत

राजन यांच्या गौप्यस्फोटाने भाजपच्या हाती चांगलेच कोलीत मिळाले आहे. देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीला मागचेच सरकार जबाबदार आहे. आम्ही ही स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा दावा भाजपने  पहिल्यापासून कला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसदेतील त्यांच्या भाषणांमध्येही हेच प्रतिपादन केले होते. तथापि, काँगेसने याचा इन्कार केला होता. मात्र आता त्यांच्याच काळातील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी सत्य बाहेर काढल्याने काँगेसच्या गोटात अस्वस्थता असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. रघुराम राजन हे तत्कालीन सरकारच्या विश्वासातील मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या विधानांना वेगळे महत्व आहे, असे राजकीय व आर्थिक वर्तुळात मानले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्थिती आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.