|Sunday, April 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात?

13 आमदारांसह जारकीहोळी बंधू भाजपात? 

‘ऑपरेशन कमळ’साठी भाजपचा खटाटोप : मागण्या मान्य न झाल्या 16 सप्टेंबरनंतर स्पष्ट निर्णय घेण्याचा इशारा

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेळगावमधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीवरून उद्भवलेला वाद उफाळून आला आहे. आमदार सतीश जारकीहोळी आणि मंत्री रमेश जारकीहोळी यांनी थेट काँग्रेस पक्षालाच आव्हान दिले असून बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी पक्षातील 13 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी चालविली आहे. 16 सप्टेंबरनंतर जारकीहोळी बंधू आपल्या राजकीय वाटचालीची दिशा ठरविणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील दोन आठवडय़ांपासून बेळगावच्या पीएलडी बँकेच्या मुद्यावरून जारकीहोळी बंधू आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस हायकमांडने तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलेले नाही. दरम्यान, युती सरकार अस्थिर करून सत्ता स्थापनेसाठी भाजपने हालचाली चालविल्या आहेत. काँग्रेसमधील फुटीचा लाभ घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांनी मंगळवारी बेंगळूरमध्ये ज्येष्ठ भाजप नेते जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, शोभा करंदलाजे, उमेश कत्ती व इतरांशी चर्चा केली.

भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असणाऱया रमेश जारकीहोळी यांनी  येडियुराप्पांकडे पक्षप्रवेशासाठी अटी घातल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, येडियुराप्पा यांनी या विषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे. रमेश जारकीहोळी यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. परंतु त्यांना उपमुख्यमंत्रिपद देता येईल, असे येडियुराप्पा यांनी सांगितल्याचे समजते.

सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या चार किंवा पाच समर्थकांना मंत्रिपद देण्यासंबंधी हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन येडियुराप्पांनी दिल्याचे समजते.

बोलणी फिसकटली

काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव आणि उपमुख्यमंत्री डॉ.जी. परमेश्वर यांनी रमेश जारकीहोळी यांच्याशी केलेली चर्चा विफल ठरली आहे. मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी परमेश्वर आणि दिनेश गुंडूराव यांनी मंगळवारी चर्चा केली. मात्र लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बाजूने उभे राहिलेल्या मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव जिल्हा राजकारणात हस्तक्षेप केल्यास आपण कोणताही कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.

अशा आहेत रमेश जारकीहोळींच्या मागण्या

पीएलडी बँकेच्या निवडणुकीवेळी आपल्या गटावर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा अन्याय वरिष्ठांनी आधी दूर करावा. सतीश जारकीहोळी यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कोणत्याही कारणास्तव मंत्रिपदासाठी विचार करू नये, शिवाय त्यांना राज्य महिला काँगेस अध्यक्ष पदावरून हटवावे, बेळगाव जिह्यातील चिकोडी आणि बेळगाव लोकसभा निवडणुकीत आपण सुचविलेल्यांनाच पक्षातर्फे तिकीट द्यावे, मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह बेंगळुरातील कोणत्याही नेत्याने बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये, अशा अटी रमेश जारकीहोळी यांनी परमेश्वर यांच्यापुढे मांडल्या आहेत.

16 सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य करा; अन्यथा…

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास जारकीहोळी बंधुंनी 16 सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवास्थानी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यांनी हायकमांडकडे मागण्या मांडल्या आहेत. 16 सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी केली आहे. तसेच सतीश जारकीहोळी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा देताना 15 दिवसांत राज्य राजकारणात महत्त्वाचे बदल होतील. त्यामुळे आपल्याला जबाबदार ठरवू नये, असे स्पष्ट केले आहे.

 

कोलांडउडीसाठी सज्ज?

रमेश जारकीहोळी-गोकाक

सतीश जारकीहोळी-यमकनमर्डी

श्रीमंत पाटील-कागवाड

महेश कमठहळ्ळी-अथणी

आनंद सिग-विजापूर

बी. नागेंद्र-बळ्ळारी ग्रामीण

प्रतापगौडा पाटील-मस्की

डी. एस. हुलगेरी-लिंगसगुर

अमरेगौडा बैय्यापूर-कुष्टगी

बसवनगौडा दद्दल-रायचूर ग्रामीण

तुकाराम-संडूर

नागेश-मुळबागील

बी. नारायण-बसवकल्याण

Related posts: