|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » कसोटीत विजय, मालिका बरोबरीत

कसोटीत विजय, मालिका बरोबरीत 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

यजमान इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दोन सामन्यांची अनाधिकृत कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. मंगळवारी दुसऱया कसोटीत खेळाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी इंडिया अ ने ऑस्ट्रेलिया अ चा 6 गडय़ांनी पराभव केला.

या दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 346 धावा जमविल्यानंतर इंडिया अ ने पहिल्या डावात 505 धावा जमवित 159 धावांची भक्कम आघाडी मिळविली त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ ने 2 बाद 38 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 102.5 षटकांत 213 धावांत आटोपला. इंडिया अ ला विजयासाठी 55 धावांची जरूरी होती. इंडिया अ ने 6.2 षटकांत 4 बाद 55 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला.

ऑस्ट्रेलिया अ च्या दुसऱया डावात हँडस्काँबने 8 चौकारांसह 56 धावा जमवित एकाकी लढत दिली. हेडने 5 चौकारांसह 47 कर्णधार मार्शने 5 चौकारांसह 36 आणि नेसरने 17 धावा तर रेनशॉन 1 षटकार 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघातील इतर फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. इंडिया अ तर्फे गौतम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर नदीम आणि चहाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. इंडिया अ ला विजयासाठी 55 धावांचे आव्हान मिळाले पण इंडिया अ ने 4 गडी गमविले. बावनेने 3 चौकारांसह नाबाद 28, भरतने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12, कर्णधार अय्यरने 3, गिलने 4, गौतम 1 तर समर्थने नाबाद 5 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ तर्फे नेसर आणि ट्रिमनने प्रत्येकी 2 गडी बाद केले. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया अ ने जिंकला होता. इंडिया अ ने दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया अ प. डाव-सर्वबाद 346, इंडिया अ प. डाव 505, ऑस्ट्रेलिया अ दु डाव 102.5 षटकात सर्वबाद 213, इंडिया अ दु.डाव 6.2 षटकात 4 बाद 55.