|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » पीव्ही सिंधू, मोमोटा, मॅरीन विजयी

पीव्ही सिंधू, मोमोटा, मॅरीन विजयी 

वृत्तसंस्था/ टोकियो

येथे सुरू असलेल्या सात लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधु तसेच स्पेनची कॅरोलिना मॅरीन आणि पुरूष विभागात विश्वविजेता जपानचा मोमोटा यांनी शानदार विजय नोंदविले. भारताच्या श्रीकांत, प्रणॉय यांनी विजयी सलामी दिली.

या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सायना नेहवाल वगळता विविध देशांच्या बॅडमिंटनपटूंचा सहभाग आहे. पुरूष एकेरीच्या सामन्यात विश्व विजेता जपानचा मोमोटाने डेन्मार्कच्या अँटोनसेनचा 21-9, 21-10 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव केला. गेल्या महिन्यात झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत मोमोटाने चीनच्या युक्विचा 21-11, 21-13 असा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत भारताच्या के. श्रीकांत आणि एच.एस.प्रणॉय यांची सत्वपरिक्षा ठरत आहे. भारताच्या एच.एस. प्रणॉयने इंडोनेशियाच्या ख्रिस्टीचा 21-18, 21-17 तसेच के. श्रीकांतने चीनच्या हुआंगचा 21-13, 21-15 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. मात्र भारताच्या समीर वर्माला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.

महिला एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनने चीनच्या बिंगजियागोचा 23-21, 21-12 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. भारताच्या पीव्ही सिंधुने चीनच्या झेंग बिव्हेनचा 21-16, 23-21 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनची मॅरीन ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. तृतीय मानांकित पीव्ही सिंधुने 53 मिनिटांच्या कालावधीत जपानच्या तेकाहेशीचा 21-17, 7-21, 21-13 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला होता.