|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » 2019 आयपीएल स्पर्धा भारताबाहेर?

2019 आयपीएल स्पर्धा भारताबाहेर? 

वृत्तसंस्था / मुंबई

2019 सालातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा भारताबाहेर भरविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. टी-20 या अति जलद क्रिकेटच्या प्रकारामध्ये आयपीएल स्पर्धेने प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. या स्पर्धेला शौकिनांचा प्रतिसाद अधिकच वाढत आहे. विदेशात याच धरतीवर स्पर्धा घेतली जाते पण शौकिनांची उपस्थिती म्हणावी तशी दिसून येत नाही. दरम्यान 2019 साली भारतामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने आयपीएल स्पर्धा विदेशात भरविण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच आयपीएल स्पर्धा देशाबाहेर भरविण्याचा निर्णय घेतला जाईल.

2009 आणि 2014 साली देशातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा विदेशात भरविण्यात आली होती. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी आणि आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक एकाचवेळी आल्याने स्पर्धा देशाबाहेर भरविण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. 2019 साली आयपीएल स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरात किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी एका ठिकाणाची निवड केली जाईल, असे वृत्त ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केले आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समिती आणि व्यवस्थापन समितीकडून या स्पर्धेच्या ठिकाणाची घोषणा केली जाईल. कदाचित 2019 ची आयपीएल स्पर्धा इंग्लंडमध्ये घेण्याबाबत विचार चालू आहे पण ही बाब अधिक खर्चिक असल्याने इंग्लंडची निवड केली जाईल असे वाटत नाही.