|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑलिम्पियन्स घडवण्यासाठी आपले प्रशिक्षक सक्षम नाहीत

ऑलिम्पियन्स घडवण्यासाठी आपले प्रशिक्षक सक्षम नाहीत 

2014, 2018 राष्ट्रकुल सुवर्णजेती महिला मल्ल विनेश फोगटचा घणाघाती आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय प्रशिक्षक उत्तम निकाल देत आहेत. पण, ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या, सर्वोच्च व्यासपीठावर जिथे स्पर्धा अतिशय शिगेला पोहोचते, तिथे सर्वोत्तम कामगिरीसाठी आपल्याला विदेशी प्रशिक्षकांची मदत घ्यावी लागते. कारण, आपले प्रशिक्षक ऑलिम्पिकमध्ये सर्वोच्च यश प्राप्त करुन देण्यासाठी अजिबात सक्षम नाहीत, असा घणाघाती आरोप महिला मल्ल विनेश फोगट हिने केला. भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आयोजित सत्कार सोहळय़ाप्रसंगी ती बोलत होती. 2014, 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णजेती विनेश अलीकडेच इंडोनेशियात संपन्न झालेल्या आशियाई स्पर्धेत देखील 50 किलोग्रॅम वजनगटात अव्वल राहिली. पण, तरीही तिचा स्वतःचा सर्वोत्तम, सक्षम प्रशिक्षकाचा शोध संपलेला नाही.

‘हंगेरीच्या वॅलर ऍको यांनी आशियाई स्पर्धेपूर्वी माझ्या कमजोरीचे विश्लेषण करत मला अनेक मोलाच्या टीप्स दिल्या आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळ कसा साकारता येईल, यासाठी बहुमोल मार्गदर्शन देखील केले. जेव्हा स्पर्धा अगदी सर्वोच्च स्तरावर पोहोचते, त्यावेळी आपल्या खेळाच्या प्रत्येक अंगाबद्दल सविस्तर उहापोह होणे आवश्यक असते आणि त्यातूनच गेमप्लॅन, रणनीती ठरत असते. वेग, तंदुरुस्ती आणि मजबुती यावर त्यात प्राधान्याने लक्ष द्यावे लागते’, असे ती पुढे म्हणाली.

‘आशियाई स्पर्धेपूर्वी मी हंगेरीला गेले होते आणि स्पर्धेला कमी कालावधी बाकी असताना परतले. स्पॅनिश ग्रँडप्रिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकले, ते देखील उत्तम प्रशिक्षणामुळेच शक्य झाले. पुढील दोन वर्षात मला असे सर्वोच्च प्रशिक्षण लाभले तर मी निश्चितपणाने ऑलिम्पिक पदक जिंकू शकेन’, असा विश्वास 2014 इंचेऑन आशियाई कांस्यजेत्या विनेशने येथे व्यक्त केला.

2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील अपयशाने मला बरेच धडे दिले, याचा उल्लेख करताना ती म्हणाली, ‘मी तेथे अति आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमत मला मोजावी लागली. आता प्रतिस्पर्ध्याला कसे आव्हान द्यायचे, त्याचा मी अभ्यास केला. अगदी आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत दडपणाखाली मी स्वतःवर नियंत्रण ठेवत संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मला यश लाभले’.

अडचणीच्या व कठीण प्रसंगी मी अनेकदा खेळ सोडण्याचा विचार केला. खडतर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली गेली, त्यात माझा कस लागला, त्यावेळी देखील खेळाला रामराम ठोकावा, असे विचार आले. पण, ज्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यावर मी ठाम होते. त्याच प्रेरणेतून मी खडतर सराव साकारला आणि नव्या तडफेने, नव्या उर्जेने खेळत राहिले’, असे विनेश पुढे म्हणाली. बुडापेस्ट येथे दि. 20 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून हंगामाची यशस्वी सांगता करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही तिने याप्रसंगी नमूद केले.