|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » कनिष्ठ नेमबाजांना रौप्य, कांस्यपदके

कनिष्ठ नेमबाजांना रौप्य, कांस्यपदके 

पदकालिकेत भारत 20 पदकांसह चौथ्या स्थानी, संघाच्या स्कीट नेमबाजांना प्रथमच यश

वृत्तसंस्था/ चांगवान (दक्षिण कोरिया)

भारताच्या कनिष्ठ नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्कीट पदकांचा पहिला सेट संपादन केला. सांघिक पुरुष गटात रौप्य व वैयक्तिक गटात गुरनिहाल सिंग गर्चाचे कांस्य, अशी दोन पदके भारताच्या खात्यात जमा झाली. या वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी भारताने शॉटगनमधील सर्व पदके जिंकली. ट्रप व डबल ट्रप इव्हेंट्सचा त्यात समावेश राहिला. एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय स्कीट नेमबाजांनी पदके जिंकण्याची यंदा ही पहिलीच वेळ ठरली आहे.

गुरनिहाल सिंग (119), अनंतजीत सिंग नरुका (117) व आयुष रुद्रराजू (119) यांनी एकत्रित 355 पदकांची कमाई करत दुसरे स्थान संपादन केले. त्यापूर्वी, सोमवारी झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी अव्वलस्थान मिळवले होते. 19 वर्षीय गुरनिहालने वैयक्तिक गटात 6 नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्राधान्याने स्थान संपादन केले. 46 अंकासह त्याने कांस्य जिंकले आणि हीच त्याच्या कारकिर्दीतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इटलीच्या इलिया सद्रुकिओलीने 55 अंकांसह सुवर्ण तर अमेरिकेच्या निक मॉकशेटीने 54 अंकांसह रौप्य पदकाची कमाई केली.

या स्पर्धेतील पदकतालिकेत भारतीय संघ 7 सुवर्ण, 8 रौप्य व 7 कांस्यपदकांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. 2020 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयएसएसएफ विश्वचषक हा पहिलाच क्वालिफाईंग इव्हेंट आहे. सोमवारी, येथे सांघिक गटात झेक प्रजासत्ताकने 356 अंकांसह सुवर्ण जिंकले तर इटालियन संघाने 354 अंकांसह कांस्यपदक कमावले.

कनिष्ठ महिला गटात अपयश

कनिष्ठ महिला 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन इव्हेंटमध्ये भारतीय संघाला 3383 अंकांसह 14 व्या स्थानी समाधान मानावे लागले. भक्ती खामकर (1132), शिरिन गोदरा (1130), आयुषी पोद्दार (1121) यांचा संघात समावेश होता. मात्र, यापैकी एकाही नेमबाजाला वैयक्तिक अंतिम फेरी गाठता आली नाही. वरिष्ठ गटात महिलांच्या स्कीट सांघिक इव्हेंटमध्ये भारतीय संघाच्या पदरी निराशा आली. त्यांना 319 अंकांसह नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. रश्मी राठोड (108), महेश्वरी चौहान (106), गनेमत सेखॉन (105) यांनाही अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम कामगिरी

भारताने या स्पर्धेच्या माध्यमातून दोन ऑलिम्पिक कोटा निश्चित केले असून एखाद्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ही संघाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अंजुम मुदगिल व अपूर्वी चंडेला यांनी महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये अनुक्रमे रौप्य व चौथे स्थान प्राप्त करत आगामी ऑलिम्पिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. पण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व निवड चाचणीतील कामगिरी यावर भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना अंतिम निर्णय घेईल.

 

 

Related posts: