|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » अर्जुन पुरस्कारासाठी अमित पनघलची शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी अमित पनघलची शिफारस 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशियाई स्पर्धेतील सुवर्णजेता मुष्टियोद्धा अमित पनघलची मंगळवारी भारतीय मुष्टियुद्ध sंसंघटनेने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. पनघलने गत महिन्यात संपन्न झालेल्या आशियाई स्पर्धेतील लाईट फ्लायवेट 49 किलोग्रॅम वजनगटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. अंतिम फेरीत त्यावेळी त्याने विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन दुस्तामोव्हला पराभवाचा धक्का दिला होता. अमित पनघलने या शिफारशीबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे आपले पदकच आपल्याशी बोलत असल्याचा भास होत असल्याचे त्याने म्हटले. 22 वर्षीय पनघल हा आशियाई सुवर्ण जिंकणारा भारताचा केवळ आठवा मुष्टियोद्धा ठरला आहे.

2012 मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर अमितचे मुष्टियुद्धातील भवितव्य कसे असेल, याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह होते. पण, अमितने एक वर्षाची निलंबनाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच यश खेचून आणले. हरियाणातील रोहटकचा रहिवासी असलेल्या अमितसाठी यंदाचे वर्ष विशेष यश देणारे ठरले. यापूर्वी मे 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकत त्याने आपल्या फॉर्मची प्रचिती दिली होती. पदार्पणाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर सहाच महिन्यात दिल्लीतील इंडिया ओपन स्पर्धेत त्याने सुवर्णपदकावर कब्जा करत दमदार यश संपादन केले.

बल्गेरियातील प्रतिष्ठेच्या स्टॅन्जा स्मृती स्पर्धेतही तो सर्वोच्च यशाचा मानकरी ठरला. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता अर्जुन पुरस्कारासाठी त्याची प्रामुख्याने वर्ल्ड व आशियाई रौप्यजेती सोनिया लथर व गौरव भिदुरी यांच्याशी चुरस असेल. दरवर्षी दि. 29 ऑगस्ट रोजी ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केल्या जाणाऱया क्रीडा दिनी खेळाडूंना सन्मानित केले जाते. यंदा हा सोहळा 25 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. ऑगस्टमध्ये आशियाई स्पर्धा सुरु असल्याने हा बदल केला गेला आहे.