|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन संघात पाच नवे चेहरे

ऑस्ट्रेलियन संघात पाच नवे चेहरे 

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघनिवड : मध्यफळीतील फलंदाज हँडस्कॉम्बला डच्चू, पीटर सिडलचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ सिडनी

पाकिस्तानविरुद्ध होणाऱया आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात पाच नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. ही मालिका नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाईल. या निवडीत अनुभवी गोलंदाज पीटर सिडलला दोन वर्षांनंतर प्रथमच पुनरागमनाची संधी मिळाली तर मध्यफळीतील फलंदाज पीटर हँडस्कॉम्बला मात्र संघातून बाहेर व्हावे लागले आहे.

आघाडीच्या जलद गोलंदाजांच्या दुखापती आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरुन बॅन्क्रॉफ्ट यांच्यावरील निलंबनामुळे निवडकर्त्यांनी येथे नव्या चेहऱयांसह संघबांधणी केली. वनडे स्पेशालिस्ट ऍरॉन फिंचला कसोटी पदार्पणाची संधी असणार आहे. त्याचप्रमाणे, क्वीन्सलँडचा मायकल नासेर, अष्टपैलू मर्नस, ब्रेन्डन डॉगेट हे नवे चेहरे असणार आहेत. जलद गोलंदाजीची धुरा प्रामुख्याने मिशेल स्टार्कसह पीटर सिडलवर असेल. जोश हॅझलवूड व पॅट कमिन्स दुखापतीमुळे या मालिकेत उपलब्ध नसतील.

केवळ आठच प्रथमश्रेणी लढती खेळलेल्या 24 वर्षीय डॉगेटला झाय रिचर्डसनऐवजी पसंती लाभणे आश्चर्याचे ठरले. पीटर सिडलसाठी दोन वर्षांनंतर प्रथमच कसोटी संघात परतेल, हे या निवडीवरुन निश्चित झाले. सिडलने यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथे शेवटची कसोटी खेळली होती. कौंटी क्रिकेटमध्ये इसेक्सतर्फे दमदार खेळ साकारल्यानंतर त्याची या मालिकेसाठी निवड झाली. युवा दक्षिण ऑस्ट्रेलियन कर्णधार ट्रव्हिस हेड पाचवा नवा चेहरा आहे. मध्यफळीत हँडस्कॉम्बची जागा भरुन काढण्याची त्याला संधी असेल. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा या संघात समावेश नाही.

मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 492 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी त्या संघात समाविष्ट असलेल्या जो बर्न्सला वगळले गेले आहे. सहकारी सलामीवीर मॅट रेनशॉचे स्थान मात्र अबाधित राहिले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ : टीम पेन (कर्णधार), ऍरॉन फिंच, मॅट रेनशॉ, ब्रेन्डन डॉगेट, मायकल नासेर, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मिशेल मार्श, ट्रव्हिस हेड, मर्नस लॅबूस्केग्न, नॅथन लियॉन, जॉन हॉलंड, ऍस्टन ऍगर, मिशेल स्टार्क, पीटर सिडल.