|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » अन् त्या ओव्हरथ्रोसाठी कूकने बुमराहचे आभार मानले!

अन् त्या ओव्हरथ्रोसाठी कूकने बुमराहचे आभार मानले! 

शेवटच्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असलेल्या शतकवीर ऍलिस्टर कूकने ओव्हरथ्रोसह 5 धावा देणाऱया जसप्रीत बुमराहचे आभार मानले. 96 धावांवर असताना कूकने रवींद्र जडेजाचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने एकेरी धावेसाठी फटकावला होता. पण, बुमराहचा जोरदार थ्रो करण्याचा प्रयत्न चुकला, चेंडू सीमापार गेल्यानंतर कूकच्या खात्यात 5 धावा जमा झाल्या आणि इथेच त्याचे शतकही साजरे झाले.

‘96 धावांवरुन मी एकेरी धाव घेतली, त्यावेळी हाच विचार माझ्या मनात होता की, आणखी 3 धावांची आवश्यकता आहे आणि कोणतीही चूक न करता शतक गाठायचे आहे, हेच लक्ष्य होते. बुमराह जोरदार थ्रो करत असल्याचे माझ्या नजरेत आले. त्याने थ्रो केला आणि जडेजा तो थोपवण्यासाठी कुठेच नव्हता. वास्तविक, बुमराहने भेदक गोलंदाजीच्या बळावर मला या मालिकेत बरेच जेरीस आणले होते. त्यामुळे, त्याच्या थ्रोवर शतक विनासायास साजरे झाले, त्याचा आनंद आहे. तसे पाहता, शेवटच्या 3 धावा जमवणे देखील तेथे कठीण होते. प्रत्येक चेंडूवर दडपणाला सामोरे जावे लागले असते. पण, त्या ओव्हरथ्रोमुळे मला ते टाळता आले आणि सहजपणे शतक साजरे करता आले’, असे कूक पुढे म्हणाला.

‘ओव्हरथ्रो सीमापार गेला आणि शतक पूर्ण झाले, त्यावेळी माझा सहकारी फलंदाज रुट देखील निशब्द झाला आणि नंतर काही सेकंदांनी त्याच्या तोंडातून शब्द आले, वॉव! मी देखील क्षणभर त्या थ्रोवर विश्वास ठेवू शकलो नाही. पण, आता त्याबद्दल मला बुमराहचे प्राधान्याने आभार मानायचे आहेत’, याचा त्याने उल्लेख केला.

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शक्य तितके योगदान मी दिले आणि आता कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी वेळ देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. केवळ खराब फॉर्ममुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला, असे म्हणता येणार नाही. पण, साधारणपणे मागील वर्ष ते दीडवर्षापासून मी बॅड पॅचमध्ये होतो, हे देखील नाकारता येणार नाही’, याची कूकने येथे खुल्या दिलाने कबुली दिली.

कूकने आपल्या या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक विक्रम मोडले. सर्वप्रथम त्याने कसोटीत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकले व नंतर स्टीव्ह स्मिथचा 32 शतकांचा विक्रम देखील मोडीत काढला. याशिवाय, आपल्या पहिल्या व शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारा तो पाचवाच फलंदाजही ठरला.